गुणांऐवजी ‘ग्रेड’ पध्दत योग्य, पालकवर्गाला समाधान

card

सोलापूर, दि. २१ – मागील काही वर्षांपासून राज्य शासनाने शिक्षणपध्दतीत आमूलाग्र बदल घडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न चालविले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे विद्यार्थ्यांचा निकाल देताना गुण व गुणवत्ता क्रमांक गुणपत्रिकेवर न देता त्याला ‘ग्रेड’ देण्याचा अचूक व उत्तम पर्याय निवडल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्थेमध्ये समाधानाची, आनंदाची प्रतिक्रिया उमटली आहे. नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकेवर टक्केवारी न देता ‘ग्रेड’ देण्याची पध्दत राज्य शिक्षण विभागाने अवलंबल्याने अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत.

या ‘ग्रेड’ पध्दतीमुळे विद्यार्थ्यांमधील स्पर्धा संपेल. पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे संपुष्टात येईल, विद्यार्थ्यांमधील नैराश्य व दडपण दूर होईल, विद्यार्थी खर्‍या अर्थाने अभ्यासाचा व ज्ञानाचा आनंद लुटू शकतील. तसेच स्पर्धाच नसल्यामुळे दोन हुषार विद्यार्थ्यांमध्ये मित्रत्व वाढेल आदी अनेक सकारात्मक बाबी या नव्या पध्दतीने सहजसाध्य होतील. या नव्या ‘ग्रेड’ पध्दतीच्या शिक्षणातील समावेशाने विद्यार्थ्यांमधील भेदभाव संपतानाच सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल. यामुळे वर्गातही हुषार व ढ असा फरक शिक्षकांकडून होणार नाही. थोडक्यात या पध्दतीमुळे निकोप ज्ञानाची कवाडे खुली होतील. पालकही आपल्या पाल्याबाबत निर्धास्त राहतील.

विद्यार्थ्यांचा तणाव निवळला
गुणांऐवजी ‘ग्रेड’ देण्याच्या गुणांक पध्दतीमुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताणतणाव, दडपण व त्यापाठोपाठ येणारे नैराश्य निवळेल, असा मतप्रवाह बळावत आहे. या ग्रेड पध्दतीमुळे सर्वच विद्यार्थ्यांना समसमान संधी मिळणार आहे. हा हुशार व तो कमी हुशार असा फरक यामुळे लोप पावणार आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थी ‘रिलॅक्स’ होतील.

Leave a Comment