आंध्रातले महाभारत

सध्या आपल्या देशात सर्वाधिक खळबळजनक घटना घडणारे राज्य कोणते असा प्रश्‍न केला, तर समोर एका राज्याचे नाव येते ते म्हणजे आंध्र प्रदेश. एका बाजूला  तेलंगणाचा लढा सुरू आहे. दुसर्‍या बाजूला कॉंग्रेसमध्ये फूट पडली आहे. तेलंगणाच्या आंदोलनामुळे तेलंगणातले वातावरण पूर्णत: कॉंग्रेसच्या विरोधात गेले आहे. मार्च मध्ये या भागात विधानसभेच्या सात मतदारसंघात पोट निवडणुका झाल्या. त्यातली एकही पोट निवडणूक कॉंग्रेसला जिंकता आली नाही. राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही ही गोष्ट बरेच काही सांगून जाते. येत्या लोकसभा निवडणुकीत तिथे काय होणार आहे हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही. तेलंगणाशिवाय आंध्रचे अन्य दोन भाग आहेत एक आहे किनारी प्रदेश आणि दुसरा आहे रायलसीमा. या दोन भागात  कॉंग्रेस पक्षाच्या फुटीचा परिणाम जाणवणार आहे. त्याचा अंदाज आता येणार आहे कारण  येत्या १२ जूनला १८ विधानसभा आणि एक लोकसभा अशा १९ मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. त्यातली विधानसभेची एक जागा सोडता बाकीच्या जागा या दोन भागातल्या असल्याने आता या भागात लोकमताचे प्रवाह कसे वहात आहेत हे कळणार आहे.
   

या निवडणुकीला का महत्त्व आहे ? याच राज्याने गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला तब्बल ३६ जागा दिल्या होत्या. देशावर कोण राज्य करणार याचा निकाल उत्तर प्रदेशात लागत असतो असे मानले जाते पण देशातल्या भाजपा आणि कॉंग्रेस या दोन मोठ्या पक्षांची ताकद नेमक्या या मोठ्या राज्यात कमी आहे. कॉंग्रेसला उत्तर प्रदेशाच्या ऐवजी आंध्रातूनच जास्त जागा मिळतात. नेमकेपणाने सांगायचे झाले तर २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला याच राज्याचा आधार होता. आताच्या स्थितीत तिथे कॉंग्रेसला एवढी मदत झाली नाही तर लोकसभेचे चित्र वेगळे असेल. म्हणजे या १९ पोट निवडणुकांवर २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल. म्हणूनच या पोटनिवडणुकांच्या निमित्ताने राज्यातले राजकीय वातावरण पार ढवळून निघाले आहे. दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे सुपुत्र खासदार जगनमोहन रेड्डी यांनी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडून वाय.एस.आर. कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाचे भवितव्य काय, हा पक्ष कॉंग्रेसला कितपत आव्हान देऊ शकतो हे आता कळणार आहे.

वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी कॉंग्रेसला चांगले नेतृत्व दिले होते. मात्र त्यांच्या पश्‍चात पक्षाला तसे नेतृत्व मिळालेले नाही. गेल्या डिसेंबरमध्ये कॉंग्रेसच्या १६ आमदारांनी विधानसभेतल्या एका मतदानामध्ये पक्षाचा आदेश झुगारून विरोधात मतदान केले. त्यामुळे या १६ जणांवर पक्षांतर विरोधी कायद्याखाली कारवाई करून त्यांचे आमदारपद रद्द करण्यात आले. ते १६ आमदार नंतर  वाय. एस. आर. कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे या १६ जागा रिकाम्या झाल्या. त्या व्यतिरिक्त प्रजा राज्यम् पक्षाच्या एका आमदारानेही वाय. एस. आर. कॉंग्रेसला पाठींबा दिला. प्रजा राज्यम् पक्षाचे संस्थापक नेते चित्रपट अभिनेते चिरंजिवी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असल्यामुळे कॉंग्रेसने त्यांना राज्यसभेवर घेतले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. अशा प्रकारे त्यांची एक जागा रिकामी झाली आहे. अशा १८ जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या नेल्लोर मतदारसंघातील कॉंग्रेसचे खासदार राजमोहन रेड्डी यांनीही वाय. एस. आर. कॉंग्रेसला पाठींबा दिला आहे आणि आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे १८ विधानसभा मतदारसंघांसोबत नेल्लोर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा होत आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या दोन पोटनिवडणुकांत जगनमोहन रेड्डी यांनी कडप्पा लोकसभा मतदारसंघात आणि त्यांच्या मातोश्रींनी एका विधानसभा मतदारसंघात प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवला. पण या पलीकडे त्यांच्या पक्षाची परीक्षा कधी झालेली नाही. ती संधी आता या पोटनिवडणुकांनी चालून आली आहे. पोटनिवडणुका होत असलेल्या १८ मतदारसंघातील  नऊ मतदारसंघ रायलसीमा भागातले आणि आठ मतदारसंघ सागर किनारी प्रदेशातील आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये नेहमीप्रमाणेच गोंधळ आणि बेशिस्तीचे वातावरण आहे. कॉंग्रेसच्या अंतर्गत परंपरागत मारामार्‍या सुरूच आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बोत्सा सत्यनारायण आणि मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्यात उमेदवार निवडीवरून मतभेद आहेत. तेलंगणातल्या पारकल मतदारसंघातील उमेदवार निवडीवरून सुद्धा मुख्यमंत्री आणि विधानसभेतले पक्षाचे प्रतोद गंद्रा व्यंकटरामन रेड्डी यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. तिथे पक्षाचे कार्यकर्ते उघडपणे बंडाच्या पवित्र्यात उभे आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री डी.एल. रविंद्र रेड्डी यांनी तर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम करण्याची घोषणाच करून टाकलेली आहे. कामगार मंत्री बी. नागेंद्र यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीमच सुरू केलेली आहे. सारी निर्णायकी आहे.

Leave a Comment