येडियुरप्पा यांची सीबीआय चौकशी होणार

नवी दिल्ली, दि.११ -कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे चौकशी करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. बेकायदेशीर खाण उत्खननासंदर्भात येडियुरप्पा यांची सीबीआयकडून आता चौकशी होईल. येडियुरप्पा यांच्यावर बेकायदेशीर खाणी प्रकरणी पदाचा दुरूपयोग केल्याचा; तसेच गैरमार्गांचा वापर करून आपल्या कुटुंबियांना लाभ मिळवून देण्याचा आरोप आहे. या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्यावरून नेमण्यात आलेल्या एका समितीने येडियुरप्पा यांची केंद्रीय गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस केली होती. ती लक्षात घेवून सर्वोच्च न्यायालयाने अशा चौकशीचा आदेश शुक्रवारी दिला. येडियुरप्पा यांच्या परिवाराशी संबंधीत ट्रस्टचीही चौकशी या आदेशाद्वारे होणार आहे.