येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची मुंबईत स्थापना – सुप्रिया सुळे

कोल्हापूर, दि. ११ – महिला वर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळाले आहे, त्याचा उपयोग करण्यासाठी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची स्थापना येत्या १० जून रोजी मुंबईत भव्य मेळाव्यात करण्यात येणार आहे. यामध्ये शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे प्रशिक्षित अभ्यासू महिला नेतृत्वाची ही नवी पाऊलवाट ठरेल, असा विश्‍वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
    कमला कॉलेजच्या भव्य मैदानात जिल्हयातील दहा हजार युवती व महिला यावेळी उपस्थित होत्या. देशाच्या आर्थिक राजधानीत महाराष्ट्रातील स्त्री शक्तीची ताकद दाखवून देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले. विशेषतः ८ ते ३५ वयोगटातील युवतींना हक्काचे व्यासपीठ देणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पहिलाच पक्ष ठरणार असून निकोप राजकारणासाठी ही एक आशादायी पाऊलवाट ठरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि महापौर कादंबरी कवाळे देखील उपस्थित होते.

Leave a Comment