एअर इंडिया वैमानिकांचे आंदोलन चिघळले- अनेक उड्डाणे रद्द

नवी दिल्ली, दि.९ – एअर इंडियाच्या वैमानिकांनी मंगळवारपासून सुरू केलेले आंदोलन दुसर्‍या दिवशीही चालूच असून त्याचा जबर फटका एअर इंडियाला बसला आहे. मुंबई आणि दिल्लीहून सुटणारी काही विमानोड्डाणे एअर इंडियाने बुधवारीही रद्द केली. त्यामुळे विमान प्रवाशांचे हाल झाले. एअर इंडियाच्या प्रवक्याने सांगितले की, सिंगापूर, न्यूयॉर्क येथे जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत.
    एअर इंडियाच्या वैमानिकांनी आजारपणाच्या रजेवर जाण्याची जी कृती केली आहे, ती सरकारने आणि एअर इंडियाने बेकायदेशीर ठरविली असून यासंदर्भात मंगळवारी १० वैमानिकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री अजितसिंह यांनीही वैमानिकांचे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. बुधवारी दिल्लीहून सिंगापूर आणि न्यूयॉर्कला जाणारे उड्डाण रद्द करण्यात आले. तर मुंबईहून न्यूयॉर्क जाणारे विमानही रद्द करण्यात आले. अन्य सर्व मार्गांवरील एअर इंडियाची विमान वाहतूक सुरळीत चालू असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
  एअर इंडियामध्ये विलीन झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या वैमानिकांना बोईंग-७८७ चे प्रशिक्षण देण्यास एअर इंडियाच्या वैमानिकांचा विरोध आहे. इंडियन एअरलाइन्सच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याच्या निर्णयाविरूद्ध वैमानिकांचे हे आंदोलन चालू आहे. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण होण्यापूर्वी बोईंग-७८७ ही विमाने मागविण्यात आली होती. त्यामुळे या विमानांसंदर्भातील प्रशिक्षण घेण्याचा हक्क हा प्राधान्याने एअर इंडियाच्या वैमानिकांना आहे, असे एअर इंडियाच्या वैमानिकांचे म्हणणे आहे.