निवडणुकांच्या तयारीला लागा – सोनिया गांधी

नवी दिल्ली, दि.९ – आत्तापासूनच आम्ही निवडणुकांच्या तयारीला लागले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले आहे. काँग्रेस पक्षाकडे सर्वांचे लक्ष आहे आणि पक्षात कोणत्याही प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेस संसदीय पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
   विरोधकांवर जोरदार टीका करताना विरोधक दुटप्पीपणे वागत असून त्यांचा खरा चेहरा जनतेपुढे आला आहे. आम्हा सर्वांना विकास हवा आहे. आगामी निवडणुका लक्षात घेवून आम्ही सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. आपल्याच सरकारवर टीका करून काही साध्य होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
  उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जो दारूण पराभव झाला, त्यानंतर सोनिया गांधी प्रथमच आपल्या पक्षाच्या संसद सदस्यांसमोर बोलत होत्या. यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रणव मुखर्जी यांच्यासह पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.