
पुणे, दि. ५ – पृथ्वी व चंद्र हे ग्रह येत्या रविवारी बुध्दपौर्णिमेला सर्वाधिक जवळ येणार आहेत. त्यामुळे नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा उद्या चंद्र तुलनेने अधिक मोठा म्हणजेच ‘ सुपर मून ’ दिसणार आहे. याचा इतर घटकांवर परिणाम होणार नसला तरी समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता आहे. असे खगोल अभ्यासक प्रकाश तुपे यांनी सांगितले.
तुपे म्हणाले की, पृथ्वी आणि चंद्र हे दर ४१३ दिवसांनी एकमेकांच्या सर्वाधिक जवळ येत असतात. उद्या सकाळी ९.०५ वाजता या दोन्ही ग्रहांमधील अंतर ३ लाख ५६ हजार ९५५ किलोमिटर राहणार आहे. चंद्राचा कोनीय व्यास ०.५५१५ अंश राहणार आहे. त्यामुळे रविवारी रात्री इतर पौर्णिमेपेक्षा मोठा चंद्र पाहता येणार आहे.
ग्रह हे सुर्याच्या भोवती वर्तुळाकार फिरत नाहित तर लंब किंवा दीर्घ वर्तुळाकार कक्षेत फिरत असतात. हा नियम चंद्र व पृथ्वीलाही लागू होतो. पौर्णिमेच्या दिवशी सुर्य, चंद्र व पृथी हे ग्रह एका रेषेत येतात; मात्र नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा ४१३ दिवसांनी येणार्या पौर्णिमेला चंद्र मोठा दिसतो. पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते. उद्या चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येणार असल्याने त्याचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर होणार आहे. नेहमीच्या भरती पेक्षा उद्या समुद्राच्या लाटा अधिक मोठ्या दिसून येतील, असेही तुपे यांनी सांगितले.
चंद्र व पृथ्वीची जवळ येण्याची प्रक्रीया दर ४१३ दिवसांनी होत असल्याने आता येत्या २३ जून २०१३ व त्यानंतर १० ऑगस्ट २०१४ रोजी पुन्हा एकदा ‘सुपर मून’ पाहता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आज दिसणारा ‘सुपर मून’ पाहण्याची संधी सोडू नये, असेही तुपे म्हणाले.
