फेसबुकच्या मार्क झुबेरबर्गला भरावा लागणार पाच हजार कोटी रूपयांचा कर

न्यूयॉर्क  दि.६-फेसबुक या सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्क साईटचा प्रमुख मार्क झुबेरबर्ग याला या वर्षी तब्बल ९०३ मिलीयन डॉलर्स म्हणजे पाच हजार कोटी रूपयांचा कर भरावा लागणार आहे. फेसबुकचा आयपीओ खुला झाल्यानंतर मार्कला होणार्‍या प्राप्तीनुसार हा कर आकारला जाणार आहे. हा कर त्याच्या मिळकतीच्या ८५ टक्कयांवर जाणार आहे. त्याच्या स्वतःच्या वाटणीच्या शेअर्स विक्रीतून त्याला १.०४५ बिलीयन डॉलर्स इतकी मिळकत होईल असा अंदाज वर्तविण्यात आला असून कराची रक्कम भरल्यानंतरही त्याच्याकडे १४२ मिलीयन डॉलर्स म्हणजे ७०० कोटी रूपये शिल्लक राहणार आहेत.
  या वर्षअखेरी फेसबुकचा आयपीओ बाजारात येत असून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उद्यापासून म्हणजे सोमवारपासून आयपीओचा रोड शो सुरू होत आहे. यात ७७ ते ९६ बिलीयन डॉलर्स या दरम्यान रक्कम शेअर्स विक्रीतून जमा होतील असा अंदाज आहे. प्रिव्ह को या अमेरिकेतील रिसर्च फर्मने हा अंदाज वर्तविला असून त्यांच्या मते २७ वर्षीय मार्क झुबेरबर्गला राष्ट्रीय कर स्वरूपात ७१४ मिलीयन डॉलर्स तर कॅलिफोर्निया राज्य करासाठी १८९ मिलीयन डॉलर्स भरावे लागतील. तरीही त्याच्याजवळ १४२ मिलीयन डॉलर्स शिल्लक राहणार आहेत.
  मार्कने भरलेल्या करामधून कॅलिफोर्निया राज्याची अर्थसंकल्पिय तूट भरून निघण्यास मोठा हातभार लागणार असल्याचेही समजते. या राज्याला सध्या निधीची मोठी गरज आहे त्यामुळे योग्य वेळी करभरण्यातून त्यांना ही रक्कम उपलब्ध होऊ शकणार आहे
  मार्ककडे कंपनीचे ५३३.८ मिलीयन शेअर्स असून त्यापैकी ३०.२ मिलीयन शेअर्स आयपीओसाठी खुले करण्यात येत आहेत. या विक्रीतून त्याला १.०५ बिलीयन डॉलर्स कॅश मिळणार असून हा शेअर २८ ते ३५ डॉलर्सच्या दरम्यान विकला जाईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तरीही मार्ककडे ५०४ मिलीयन शेअर्सची मालकी राहणार असून प्राईस रेंजमध्ये फेसबुक टॉपवर राहिल्यास त्या शेअर्सची एकूण किंमत असेल १७.६ बिलीयन डॉलर्स.

Leave a Comment