
नवी दिल्ली, दि. २ – शांततेचे नोबल पारितोषिक विजेत्या आणि शेजारील म्यानमारच्या विरोधी पक्षनेत्या आंग सान स्यू की यांनी मंगळवारी म्यानमारच्या संसद सदस्यत्वाची शपथ घेतली. गेला आठवडाभर सैन्यदलाच्या नेतृत्वाखालील संसदेत सदस्यत्वाची शपथ घेण्यावरुन आंग सान स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षात उलट सुलट चर्चा सुरु होती. अखेर संसदेवर बहिष्कार टाकण्यापेक्षा संसदेत जाऊन राजकीय सुधारणा घडविण्यावर पक्षात मतैक्य झाले. त्याची परिणती म्हणून, मंगळवारी आंग सान स्यू की आणि त्यांच्या पक्ष सदस्यांनी देशाच्या राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन एक ऐतिहासिक पाऊल टाकले.
म्यानमारचे लष्करशहा, राष्ट्राध्यक्ष थेन सीन यांनी गेली दोन दशके आंग सान स्यू की यांना नजरकैदेत ठेऊन देशात प्रचंड दडपशाही केली होती. मात्र अलिकडेच, काही महिन्यांपासून त्यांनी मवाळ धोरण स्वीकारीत, शेकडो राजबंद्यांची तुरुंगातुन सुटका केली. तसेच वांशिक अल्पसंख्यांकांविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला स्थगिती दिली. याच काळात त्यांनी लोकशाहीचा मुलामा दिलेल्या सार्वत्रिक निवडणुका देखील घेतल्या. म्यानमारच्या ६६४ सदस्यीस राष्ट्रीय विधीमंडळात आंग सान स्यू की यांची नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पार्टी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून निवडली गेली असली, तरी त्यांचे संसदीय संख्याबळ नगण्यच आहे. वस्तुतः राष्ट्रीय विधिमंडळाचे कामकाज सोमवारीच संपविण्यात येणार होते. परंतु आंग सान स्यू की व त्याच्या सहकारी सदस्यांना संसद सदस्यत्वाची शपथ घेऊन पदग्रहण करता यावे यासाठी कामकाजाचा कार्यकाळ बुधवारपर्यंत वाढविण्यात आला.
संसदेबाहेर राहून विरोध करण्यापेक्षा संसदेत राहूनच घटना दुरुस्ती करण्याचे आपले उदिष्ट् गाठता येईल, अशा विचारानेच आम्ही राष्ट्रीय विधीमंडळाचे सदस्य स्वीकारण्याचे निश्चित केले. काही वेळा सावधगिरीचा पवित्राच उपयुक्त ठरतो असे स्यू की या संबंधाने बोलताना म्हणाल्या.
