विदर्भातल्या शेतकर्‍यांचे आता थेट दिल्लीत आंदोलन

मुंबई, दि. २ –  शेतकर्‍यांना कर्जाच्या खाईत लोटून त्यांच्यावर अत्याचार करणार्‍या अवैध सावकारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी विदर्भातील शेतकर्‍यांनी आता थेट दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १० मे रोजी पंतप्रधान कार्यालयासमोर संपूर्ण कुटुंबासहीत धरणे धरण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. या धरणे आंदोलनानंतर १२ मे रोजी राष्ट्रपतीभवनात जाऊन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना साकडे घालण्याचे या शेतकर्‍यांनी ठरविले आहे.
    विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या अवैध सावकारांच्या जाचामुळे होतात. त्यामुळे या व्यथांच्या कथा जाणून घेवून अवैध सावकार विरोधी कायदा राष्ट्रपतींनी मंजूर करावा अशी मागणीही शेतकरी करणार आहेत.
    नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान म्हणजे ११ एप्रिल रोजी या शेतकर्‍यांनी मुंबईतील आझाद मैदानावर अवैध सावकार विरोधी कायदा लागू करावा यासाठी आंदोलन केले होते. यावेळी राज्य सरकारने या शेतकर्‍यांना आश्‍वासन देऊनही पाळले नाही. राज्य सरकारने सावकारांच्या ताब्यातील शेतजमिनी शेतकर्‍याला परत देण्यासाठी २२ मार्च २०१० रोजी मान्यता दिली. पण राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी गेली २३ वर्षें हे विधेयक केंद्रीय गृहखात्याकडे धूळ खात पडून आहे. हे विधेयक अजून राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पोहोचलेच नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, आता अखेर या अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी दिल्लीत जावून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सहकुटुंब साकडे घालायचा निर्णय घेतला आहे.
    सावकार मसिहा म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आमदार सानंदाच्या दबावाखाली येवून सावकार सानंदाला वाचविले, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सिद्ध झाले आहे, त्यामुळे २००५ ते २०११ या कालावधीत सावकारग्रस्त शेतकर्‍यांनी सावकारांविरूद्ध केलेल्या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या. यातल्या एकाही प्रकरणात सावकारग्रस्त शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिला गेला नाही. यातूनच सरकार सावकारांच्या दबावाखाली होते, हेच सिद्ध होत असल्याची भावना एका शेतकर्‍याने बोलून दाखविली आहे.

Leave a Comment