
पुणे, दि. २८ – यंदाच्या हंगामात साखरेचे ८८ ते ९० लाख मेट्रिक टन उत्पादन होईल, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी पुण्यात दिली. १० मेपर्यंत राज्यातील सर्व गाळप पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर या भागांत काही ठिकाणी ऊस शिल्लक असून,या ठिकाणी अजूनही कारखाने सुरु आहेत. आतापर्यंत ७३० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. आमच्या नियोजनाप्रमाणे १० मेपर्यंत हे सर्व गाळप पूर्ण होईल. तसेच आकडेवारीनुसार यंदा साखरेचे उत्पादन ८८ ते ९० लाख मेट्रिक टनापर्यंत जाईल तर देशपातळीवर हे उत्पादन २२० ते २३० लाख मेट्रिक टन इतके असेल. यंदाची सरासरी ११ टक्के इतकी आहे.
गाळप कमी
यंदाच्या हंगामात ५० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप कमी झाले आहे. परतीच्या पावसाच्या अभावी तसेच वाढलेला उन्हाचा कडाका हे त्यामागील प्रमुख कारण आहे. यामुळे टनेजमध्ये २ ते ३ टनाचा फरक पडला आहे. केंद्राने सध्या १० लाख मेट्रिक टन निर्यातीची परवानगी दिली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर उतरले आहेत. आणखी १० लाख मेट्रिक टनच्या निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
