एमकेसीएल आणि एस. टी. महामंडळाच्या वादामुळे नोकर भरती लांबणीवर

पुणे, दि. २२  – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी एमकेसीएलने (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) निविदा दाखल केली आहे, मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एमकेसीएलने प्रत्येक उमेदवारामागे नमूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त पैशांची मागणी केली आहे. महामंडळाने ही मागणी अमान्य करून दुसर्‍या क्रमांकावरील कंपनीला संधी देण्याबाबत विचार करत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
 या गोंधळामुळे एसटीमध्ये १९ हजार कर्मचार्‍यांची भरती लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमकेसीएलच्या या अजब कारभाराची राज्य सरकारकडे तक्रार दाखल करणार आहे. महामंडळात पुढील आठ महिन्यांत चालक, वाहक, सहाय्यक, लिपिक आणि अन्य अशा सुमारे १९ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखती असे या भरती प्रक्रियेचे स्वरूप आहे. ही भरती आऊटसोर्सिंग पद्धतीने होणार आहे. त्यासाठी एस. टी. महामंडळाने निविदा मागवल्या होत्या. एमकेसीएल आणि बेंगळूरुची मेरिट कॉर्पोरेशन या कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. एमकेसीएलने प्रती उमेदवार १२३ रुपये २० पैसे, असा दर दिला आहे. हा दर मेरिट कॉर्पोरेशनने दिलेल्या दरापेक्षा थोडासा कमी असल्याने एमकेसीएलची निवड करण्यात आली, मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एमकेसीएलने एस. टी. महामंडळाला पत्र लिहून प्रती उमेदवार जादा पैसे देण्याची मागणी केली.
    एमकेसीएलने हट्ट कायम ठेवल्यास राज्य सरकारकडे तक्रार करू आणि मेरिट कॉर्पोरेशनला संधी देण्यात येईल. एमकेसीएलच्या वाढीव रकमेच्या मागणीच्या तुलनेत या कंपनीची निविदा परवडणारी आहे, असे सांगण्यात आले. दरम्यान, या गोंधळाचा भरती प्रक्रियेला फटका बसण्याची शक्यता आहे. पुन्हा निविदा काढाव्या लागल्यास त्यात आणखी वेळ जाईल, असे महामंडळाचे म्हणणे आहे.