काटजूंचे काय चुकले ? न्या. काटजूंच्या मते देशातले ९० टक्के लोक मूर्ख

    आपल्या वर्तनावर आणि बोलण्यावर गीतेचा फार मोठा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सत्य बोलण्यावर फार मौलिक मार्गदर्शन केले आहे. ‘खरे’ बोलावे की ‘बरे’ बोलावे यावर आपले मत मांडताना श्रीकृष्णांनी, खरे बोलण्याची गरज असेल तर जे बरे आहे तेवढेच खरे बोलावे असे म्हटले आहे. खरे बोलणे अप्रिय असेल, मनाला घरे पाडणारे असेल तर ते खरे न बोललेले बरे. न ब्रुयात सत्यं अप्रियं. म्हणजे जे सत्य अप्रिय असेल ते सत्य बोलू नका. या शिकवणुकीनुसार आपण परखड सत्य बोलण्याचे टाळत असतो. एखाद्या गावात एखादे नेते मोठे असतात. त्यांच्या हातात अमाप सत्ता आणि अगणित पैसा असतो. त्यांच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचे असेल तर त्यांना शहाणे म्हणा, ते शहाणे नसले तरीही त्यांना शहाणे म्हणा, त्यांच्याकडून आपले काम काढून घ्या असे आपले व्यवहार ज्ञान सांगत असते. आपण वर्षानुवर्षे असेच वागत आलो आहोत. त्या नेत्याला त्याची खरी लायकी दाखवून देण्याचा अव्यवहारीपणा आपण कधी करीत नाही. म्हणून मग गावागावातले नेते स्वत:लाच देशाचे भाग्य विधाते मानत आले आहेत. परखड सत्य न सांगण्याचा सामान्य माणसाचा कथित व्यवहारीपणा हेच अशा नेत्यांचे भांडवल झाले आहे.
     त्यांना सत्य सांगण्याच्या भानगडीत जे पडले त्यांच्या दुकानावरून बुलडोझर फिरले आहेत. म्हणून त्यांना ते न सांगणे हाच लोकांना शहाणपणा वाटत आला आहे. प्रत्यक्षात हे शहाणे व्यवहारी म्हणवणारे लोकच मूर्ख असतात. कारण त्यांच्या त्या कथित शहाणपणाने समाजाचे लांबच्या पल्ल्याचे नुकसान होत असते. त्यांच्या कथित शहाणपणाला त्यांचा तात्पुरता स्वार्थ दिसत असतो पण त्यांना समाजाचे लांबच्या पल्ल्याचे अहित दिसत नाही. समाजात अशा कथित ‘व्यवहारी’ आणि ‘स्वार्थी’ पण नेभळट लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे देशाचे नुकसान होत असते. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूतीं काटजू यांनी समाजाच्या या वैगुण्यावर नेमकेपणाने बोट ठेवले आहे आणि देशातले ९० टक्के लोक मूर्ख आहेत असे स्पष्ट म्हटले आहे. आपले ‘व्यवहारी ज्ञान’  आपल्याला एवढे सत्य बोलायची परवानगी देत नाही कारण त्यामुळे समाज नाराज होत असतो. एखादा माणूस मूर्ख आहे हे खरे पण त्याला त्याच्या तोंडावर, तू मूर्ख आहेस असे म्हणता येत नाही. म्हणता कामा नये अशी आपली शिकवण आहे पण ती बाजूस ठेवून न्या. काटजू यांनी हे सत्य सांगितले आहे. कारण ते सत्य सांगायची गरज आहे असे त्यांना वाटते.
    न्या. काटजू यांनी सांगितलेले हे सत्य ‘बरे’ नाही. रुचणारे नाही. पण, ते सत्य आहे.  आपल्या समाजातले ९० टक्के लोक खरेच मूर्ख आहेत. याची काही उदाहरणे काटजू यांनी दिली आहेत. ती उदाहरणे पाहिल्यावर काटजू यांचे म्हणणे चुकीचे आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. न्या. काटजू यांनी दिलेली काही उदाहरणे पाहिली तर आपल्याला त्यांच्या म्हणण्यातले तथ्य कळेल. आपल्या देशातले ९० टक्के  लोक जातीयवादी भावनेच्या आहारी जाणारे आहेत. ते अंधश्रद्ध आहेत. असे काटजू यांनी म्हटले आहे. आपल्या देशातले बहुतेक लोक आपल्या हातातले आपले भवितव्य ठरवणारे मतदानाचे शस्त्र मूर्खासारखे वापरतात. हे सत्य नाही का ? या देशातले करोडो मतदार मतदानाच्या रात्री कोणाच्या गाड्या आपल्या दारात नोटांचे पुडके घेऊन येतात याची वाट पहात असतात हे सत्य नाही का ? मग आपल्या देशातले आमदार आणि खासदार पैसा, गुंडगिरी आणि जात यांचा फायदा घेऊनच निवडून येत असतील, ते त्यांच्या गुणवत्तेच्या निकषावर निवडून येत नसतील तर अशा प्रतिनिधींतून साकार होणारे आपले सरकार आपले कल्याण कसे करील ?
    असे सरकार आपले कल्याण करीत नाही हे वारंवार आपल्या अनुभवालाही येत आहे. स्वातंत्र्य मिळवून ६५ वर्षें झाली तरी आपल्या सरकारांनी देशातल्या नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणीही दिले नाही. असे असूनही केवळ एक रात्री नशा आणणारी दारू आणि काही शे रुपये एवढ्या किंमतीत आपण पुन्हा त्याच नालायक प्रतिनिधींना निवडून देतो की नाही ? देशाचा कारभार करणे हे काही गल्लीतल्या गुंडांचे काम आहे का ? एवढेही आपल्या देशातल्या लोकांना कळत नाही. म्हणून खून, बलात्कार, मारामार्‍या, अपहरण असे गुन्हे असणार्‍या गुंडांना हे लोक देशाचे कायदे करण्याच्या कामासाठी निवडतात. हे काय शहाणपणाचे लक्षण आहे का ?
    हे तर अशिक्षित लोक आहेत पण आपल्या देशातले  शिकले सवरलेले लोकही जातीचा आधार घेतात की नाही ?  वकिलांच्या आणि प्राध्यापकांच्या संघटनांच्या निवडणुकाही जातींच्या आधारावर होतात. मग एवढ्या उच्चशिक्षित लोकांच्याही मनात जात ठाण मांडून बसलेली असेल तर मग सामान्य माणसाची काय बात ? हे उच्च शिक्षित लोकही मूर्खच आहेत असे काटजू यांचे मत आहे. या मतात चूक काही नाही. एखाद्या उच्च शिक्षित प्राध्यापकाला ‘जात’ या विषयावर एखादा संशोधनपर पेपर सादर करायला सांगितला, तर तो त्या पेपरमध्ये जातीची कल्पना कशी निराधार आहे, हे अनेक पुराव्यांच्या आधारे पटवून देतो. पण स्वत: लग्न करताना मात्र त्याला त्या पेपरची थोडीही आठवण येत नाही. तो जातीतली मुलगी शोधून विवाह करतोच पण खच्चून हुंडाही घ्यायला मागे पुढे पहात नाही. येथे प्राध्यापकांना दुखावण्याचा हेतू नाही (आणि दुखावल्याशिवाय सत्य सांगताही येत नाही) पण आपल्या देशातल्या ९० टक्के लोकांचे वर्तन असेच असते.  या उदाहरणात मूर्खपणा नाही तर ढोंगीपणा आहे. पण अनेक प्रकारच्या वर्तनात मूर्खपणाही दिसत असतो. एक साधे उदाहरण घेऊ. आपल्या गावात एखादी गुंतवणूक कंपनी येते आणि भरपूर व्याजदराचे आमिष दाखवून लोकांच्या लाखोंच्या ठेवी गोळा करते. एके दिवशी लोक ठेवीवरचे व्याज आणायला जातात तर कंपनीच्या दुकानाला कुलूप लागलेले आणि कंपनीचा मॅनेजर पळाला असल्याचे दिसते. लोक कपाळाला हात लावतात. एवढा प्रकार घडल्यानंतर लोक काही दिवस सावध राहतात पण काही दिवसांनी एखादा आणखी नवा एजंट येतो आणि पुन्हा त्याच दुकानात ठेवी गोळा करायला बसतो. पण एकदा फसलेले लोक पुन्हा नव्याने फसवणूक करून घेण्यासाठी त्याच दुकानात रांगा लावतात.
    गावागावांत लोकांना आशिर्वाद देण्यासाठी प्रकट झालेले बाबा,  महाराज, गुरू आणि महागुरू यांचे किती प्रस्थ माजले आहे .या लोकांकडून जनतेची फसवणूक होत असते. अशा बाबांमुळे आपल्या आयुष्याचे कल्याण होत नाही हे अनुभवाला येत असते पण तरीही लोक या ढोंगी बाबांकडे पुन्हा पुन्हा रांगा लावतातच. हा मूर्खपणा नाही का ? माणसाच्या बगलेतून  मंत्र म्हणून सोने निर्माण होत नाही. हे सत्य आहे. ते शेंबड्या पोरालाही कळते पण तरीही या चमत्काराला नमस्कार करून अशा बाबांच्या पायाचे तीर्थ प्राशन करायला देशाचे आदरणीय नेतेही रांगा लावतात. याला काय म्हणावे ?१९९१ साली आपल्या देशाचे २०० टन सोने गहाण टाकावे लागले. त्यावेळी या आदरणीय नेत्यांनी या सोनेरी बाबांना बगल वर करायला लावायला हवी होती. कदाचित २०० टन सोने पडायला वेळ लागला असता आणि बाबांच्या हाताला कळ लागली असती पण देशाच्या कल्याणार्थ त्यांना तसे करायला काही हरकत नव्हती. बाबांनी हात वर केलेला आणि रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी खाली तराजू घेऊन बसलेले. किती छान झाले असते ? बाबांच्या सहवासात या लोकांना म्हणे मानसिक शांती मिळते ! खरे ही मानसिक अशांती हा हव्यास आणि दिशाहीन जगण्याचा परिणाम असतो. अशा अशांतीवर मानसशास्त्राचे शिक्षण घेतलेला कोणताही पदवीधर समुपदेशाने मार्ग दाखवू शकतो. पण उगाच गूढ वाटणार्‍या मानसिक अशांतीसाठी हे लोक अज्ञानाने अशा बाबांना मान देतात आणि ‘महाजनो : ये न गत: सपंथा:’ या न्यायाने त्यांचे अनुकरण करून अनेक सामान्य माणसेही बाबांचा जयजयकार करायला लागतात. न्या. काटजू यांनी योग्यच म्हटले आहे पण प्रश्‍न एवढाच आहे की आपल्याला ते सत्य पेलवेल का ?
    न्या. काटजू यांनी नट नट्या आणि क्रिकेटपटूंना वाहिलेल्या पत्रकरितेलाही सोडलेले  नाही. आपल्या समाजातले खरे गंभीर  प्रश्‍न ज्वलंत होत असताना आपण आपला किती वेळ आणि वृत्रपत्रातली किती जागा या नटरंगांसाठी आणि खेळाडूंसाठी देत असतो. लोकांच्या मूर्खपणाचे एक लक्षण म्हणजे अझरुद्दीनचे निवडून येणे. तो मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली खेळातून बाद झाला असतानाही त्याला लोकांनी खासदार म्हणून निवडून दिले. हैदराबादचा हा क्रिकेटवीर उत्तर प्रदेशात जाऊन निवडून आला. तो कसा निवडून आला हे सर्वांना माहीत आहे. काटजू म्हणतात त्यात चूक काय आहे ?

Leave a Comment