नागपूर, दि. १६ – चंद्रपूर महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, सकृतदर्शनी त्रिशंकू महापालिका अस्तित्वात आलेली आहे. या महापालिका निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही.
आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यावर दुपारपर्यंत सर्वच्या सर्व म्हणजे ६६ जागांचे निकाल जाहीर झाले. त्यात कॉंग्रेस २६ जागा घेऊन सर्वात कोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपने कॉंग्रेस खालोखाल १८ जागा घेतल्या आहेत. शिवसेनेला ५, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. याशिवाय भारिप बहुजन महासंघ १ जागा, मनसे १ जागा, बसपा १ जागा आणि १० अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
सद्यस्थितीत महापौर बसविण्यासाठी ३४ जागांची आवश्यकता असून कॉंग्रेसला मॅजिक फिगर गाठण्यासाठी ८ जागांची गरज आहे. भाजपला सत्ता बसविण्यासाठी अजून १६ जागा हव्या आहेत. जिल्हा परिषदांमध्ये भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि इतर अशी तडजोड होऊन कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले होते. यावेळी हा प्रयोग करायचा झाल्यास सर्वच्या सर्व ३० एकत्र आले तर कॉंग्रेस सत्तेपासून दूर ठेवली जाऊ शकते. मात्र कॉंग्रेस १० अपक्षांना सोबत घेवून इतर सर्वांना सत्तेबाहेर ठेवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकंदरीतच चंद्रपूर महापालिकेत घोडेबाजाराला वेग येणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार यांना त्यांच्या वार्डातही जबरदस्त धक्का बसला असून दोन्ही भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
