जोरदार वार्‍यासह पुण्यात पावसाची हजेरी

पुणे,  दि. १६ – ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात शहर आणि परिसरात जोरदार वादळी वार्‍यासह उन्हाळी पावसाने हजेरी लावली. उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे थंडावा मिळाला असला तरी अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची भंबेरी उडाली. मात्र, अचानक आलेल्या या पावसात भिजण्याचा अनेकांनी मनमुराद आनंद लुटला.
    पूर्व मध्यप्रदेशापासून ते केरळ, अंदमान निकोबारपर्यंत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे पुण्यात काल संध्याकाळी पाऊस झाला. यावेळी १.५ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे तापनात किंचीत घट झाली आहे. काल सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर येथे ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले, तर पुण्यात  ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात वातावरण ढगाळच होते. त्यामुळे  ऊन-सावलीचा खेळ सुरु होता. काल उपारपर्यंत अंगाची लाही-लाही करणारे ऊन होते. मात्र, दुपारनंतर आकाश अचानक झाकाळून आले. सायंकाळी पाचनंतर थंड वारा सुरु झाला आणि शहराच्या अनेक  भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील नागरिक तसेच पदपथावरील विक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. काहींना आडोसा शोधावा लागला तर अनेकांनी पावसात भिजणेच पसंत केले.     
    २४ तासापूर्वीच वेधशाळेने दक्षिण भारतातून उत्तरेकडे येत असलेल्या पावसाळी ढगांमुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र, काल दुपारनंतर अरबी समुद्राकडून सुमारे १ हजार ८ किमी वेगाने पच्छिमेकडून पुर्वेकडे येत असलेले गरम हवेचे वारे. तसेच दक्षिण भारतातून दक्षिणेकडून उत्तरेकडे १ हजार १२ किमी वेगाने येणारे पावसाळी ढग यामुळे काल राज्यात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होवून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.  पुढील ४८ तासाच हीच स्थिती राहणार असून राज्यात दक्षिण कोकण -गोवा, मध्यमहाराष्ट्र,  मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
     काल संध्याकाळी नोंदवण्यात आलेले कमाल आणि किमान तापमान (अंश सेल्सिअस)
    पुणे-३८.९ (२१), नगर-३९.७(२०.८), जळगाव-४१.३(२५.८), कोल्हापूर-३७.७(२४.४), महाबळेश्‍वर-३२.६(१९.६), मालेगाव-४४ (२२), नाशिक-३८.७(२१.१), सांगली-३८.१(२४.१), सातारा -३९.८(२१.५), सोलापूर-४०.३(२२.६),  मुंबई-३३.२(२६.७), सांताक्रुज-३३(२४.२), रत्नागिरी- ३२.९(२४.१), पणजी-३४.४ (२७.१), डहाणू- ३४.२(२५.८), औरंगाबाद- ३९.२(२३.८), परभणी-४१.८(२४.६), नागपूर- ४१.४(२३.२), चंद्रपूर- ४४(२७).

Leave a Comment