
पुणे, दि. १२ – वातावरणातील आद्रता वाढून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुणे वेधशाळेने दक्षिण मध्य महारष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कोकण-गोवा आदी ठिकाणी तुरळक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राज्यभरातील तापमानात किंचीत घट झाली आहे. काल पुण्यात ३७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदकरण्यात आली.
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाली आहे. तर राज्यात उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास आले आहे. वातावरणातील आद्रता वाढल्याने राज्यात अनेक ठिकाणी कमी दाबचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होवून मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडण्याची प्रक्रीया ही सामान्य असून एका वर्षाच्या फरकाने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
येत्या ४८ तासात राज्यात हवामान ढगाळ राहणार असून कमाल तापमान ३९ अंश सेल्सिएस तर किमान १९ अंश सेल्सिएसच्या आसपास असणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
पुणे तापमान अंदाज-
वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने शहर आणि परिसरात सुमारे दोन अंश सिल्सिअसने तापमानात घट झाली आहे. येत्या ४८ तासात आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून शहराच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३८ अंश सेल्सिएस तर किमान २० अंश सेल्सिएसच्या आसपास असणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
