
भुवनेश्वर, दि. २५ मार्च- नक्षलवाद्यांनी कंधमाल परिसरातून अपहरण केलेल्या दोन इटालीयन पर्यटकांपैकी एकाची मुक्तता नक्षलवाद्यांनी रविवारी केली आहे. मात्र अद्याप दुसरा पर्यटक त्यांच्याच ताब्यात असून, सत्ताधारी बिजू जनता दलाच्या आमदाराचाही ठावठिकाणा लावण्यात ओडिशा पोलिसांना यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर रविवारी राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्याचे शीर्षस्थ पोलिस अधिकारी व प्रशासकीय अधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
मुख्यमंत्री पटनाईक यांनी आवाहन केल्यानंतरही नक्षलवाद्यांनी राज्य सरकारशी संवाद साधण्याकरिता आपले मध्यस्थ अद्याप जाहीर केलेले नाहीत. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते दंडापाणी मोहंती आणि जनजाती तज्ज्ञ बी.डी.शर्मा यांच्यावर नक्षलवाद्यांनी आपली बाजू राज्य सरकारकडे मांडण्याची जबाबदारी सोपविली होती. पण शनिवारी झिना हिकाका या आमदाराचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यानंतर या दोन्ही मध्यस्थांनी नक्षलवाद्यांची वकिली करण्यास नकार दिला. त्यानंतर रविवारी नक्षलवाद्यांनी इटालीयन पर्यटकांपैकी एकाला पत्रकारांच्या हवाली केल्यामुळे उर्वरित दोघा अपह्रतांची सुटका होण्याच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत.
