आघाडीचा धर्म

खरे तर धर्म हा शब्द फार बदनाम झाला आहे कारण काही राजकीय पक्षांनी धर्माला राजकारणात ओढले आहे. राजकारण या शब्दाचा स्पर्श झाला तरी कोणतीही गोष्ट घृणास्पद वाटायला लागते. खरे तर राजकारणही काही एवढे वाईट नसते. पण ते आपण वाईट करून टाकले आहे. त्यामुळे आधीच राजकारण बदनाम झालेले त्यात धर्माला ओढल्याने धर्मही बदनाम झालेला अशा या दोन बदनाम शब्दांची जोड करून ‘आघाडीचा धर्म’ नावाचा एक शब्द राजकारणात तयार झाला आहे.

गेले दोन दिवस महाराष्ट्रात आघाडीचा धर्म कोणी मोडला आणि कोणी पाळला यावर ‘घमासान’ सुरू आहे. आपल्या भाषेवर दूरदर्शनमुळे हिदीचा प्रभाव  कसा पडला आहे याची ही ‘निशाणी’ आहे. (पुन्हा एक हिदी शब्द ‘रिपीट’ झालाच). तर एकंदरीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीचा धर्म कोणी मोडला यावर भांडण सुरू आहे. या भांडणात खरे कोण आणि खोटे कोण याचा आपण काही निर्णय करणार नाही कारण  दोघेही स्वार्थी आहेत. कमालीचे संधीसाधू आहेत. त्यांच्या तडी धर्म हा शब्दही शोभत नाही.

त्यांनी तोंड वर  करून आणि मोठ्या नीतीमत्तेचा आव आणून ‘आघाडीचा धर्म’ हा शब्द शंभरदा वापरला तरी या दोन्ही पक्षांना हा शब्द वापरण्याचाही नैतिक अधिकार नाही. त्यांची आघाडी हाच राजकारणातला एक अधर्म आहे. १९९९ साली शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्याला हात घातला आणि परदेशात जन्मलेली व्यक्ती भारताचे नेतृत्व करू शकणार नाही, आम्ही तिला नेता म्हणून स्वीकारणार नाही असे म्हणत काँग्रेसमधून दुसर्‍यांदा बाहेर पडून आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. आता तरी पवार या राष्ट्रवादी मुद्यावर ठाम राहतील आणि जन्मभर त्यासाठी लढा देतील असे  वाटले होते पण हे बंड करून वर्षही झाले नाही तोच त्यांनी १८० अंशात अबाऊट टर्न (?) केले.

या परदेशी  व्यक्तीचे नेतृत्व स्वीकारून तिच्याशी हातमिळवणी करून खुर्चीची ऊब पुन्हा प्राप्त करता येते हे दिसायला लागताच  पवारांनी आपला मुद्दा गुंडाळून ठेवला आणि आपल्या मुद्याला बगल देऊन राज्यात आणि केन्द्रातही सत्ता मिळवली. अशी ही तत्त्वांना पायदळी तुडवून केलेली मतलबी आघाडी आहे. तिच्या समोर धर्म हा शब्द जोडता कामा नये. चोरांचाही धर्म असतो. पाकिटमार धंद्याला जाण्यासाठी घरातून निघताना ब्लेड (?) चे पाते, देवाच्या तसबिरीसमोर ठेवून तिच्या पाया पडतो व  मोठ्या श्रद्धेने लोकांचे खिसे कापतो.

त्याचा एरिया(?) ठरलेला असतो त्यात दुसरा पाकिटमार धंदा करायला लागला तर तो त्याला आपल्या ‘धर्मा’ची आठवण देतो. त्याला धर्म हा  शब्द वापरण्याचा अधिकार नाही असे आपण कितीही म्हणत असलो तरीही तो आपल्या आचार संहितेला धर्मच म्हणत असतो. अशाच प्रकारे अधर्मातून निर्माण झालेल्या आघाडीचा धर्म मोडला म्हणून हे दोन पक्ष एकमेकांच्या नावाने बोटे मोडत आहेत. ते वाटेल ते मोडतील. धर्म मोडतील, बोटे मोडतील, एकमेकांच्या मानाही  मोडतील पण ही आघाडी मोडणार नाहीत कारण तसे केल्यास या दोघांनाही खुर्ची सोडावी लागेल.

एकंदरीत या आघाडीच्या धर्मावरून या दोघांत मोठेच मनोरंजक सवाल जबाब सुरू आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला आहे. तसे त्यांच्या या आरोपाला काहीही महत्त्व नाही कारण  त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही स्थान नाही. त्यांच्या वडलांनाच स्थान नाही तर त्यांना कोण महत्त्व देणार आहे ? पण त्यांनी या संबंधात केलेलेविधान मोठे मनोरंजक असल्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह घड्याळ न ठेवता खंजीर हे ठेवावे असे त्यांनी म्हटले आहे. कदम यांचे हे विधान पवारांच्या जिव्हारी लागणारे आहे हे नक्की.

खरे तर कोणाचेही निवडणूक चिन्ह खंजीर असल्याने काही बिघडत नाही. पण तो खंजीर समोरून छातीत खुपसण्यात शौर्य आहे, पाठीत खुपसण्यात दगाबाजी आहे. कदम यांना पवारांवर पाठीत खंजीर खुपसण्याचा  आरोप करायचा आहे. अर्थात पाठीत खंजीर खुपसण्याचा काँग्रेस पक्षालाही अनुभव आहे. स्व. यशवंतराव चव्हाण उप पंतप्रधान असलेल्या चरणसिग सरकारला पाठिबा देऊन तो काही दिवसांतच काढून घेण्याचा इंदिरा गांधी यांनी केलेला प्रकार हा पाठीत सुरा खुपसण्याचाच होता.   पतंगराव कदमांच्या पाठीत तर देशाच्या ‘पहिल्या’ जावयाने  सोन्याचा खंजीर खुपसला होता. तो काँग्रेस पक्षातलाच होता.

तेव्हा राजकारणी लोक एकमेकांच्या पाठीत आणि पोटात खंजीर खुपसतच असतात. मात्र विश्वजीत कदम यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की, पवार हे पाठीत खंजीर खुपसण्यात ‘माहीर’ आहेत हे काय काँग्रेसच्या नेत्यांना माहीत नव्हते का ? त्यांनी  अशा पवारांना जवळ केलेच कशाला ? आता जिल्हा परिषदांत काही ठिकाणी शिवसेनेचे धनुष्य धरले आहेच मग ते पूर्वीच  धरले असते तर पवारांशी मैत्री करायची वेळच आली नसती. पण त्यांनीही पवारांना आपणहून मिठी मारली आहे. ज्याच्या हातात खंजीर आहे हे माहीत आहे त्यालाच मिठी मारल्यावर तो खंजीर खुपसणारच ना ! मग त्याने खंजीर खुपसला म्हणून आरडा ओरडा करण्यात काय अर्थ आहे ? पवारांशी कधीच मैत्री करायची नाही असा निर्धार करा.त्यामुळे सत्ता गमवावी लागली तरीही हरकत नाही अशी मनाची तयारी करा. मग खंजीराची भीतीच राहणार नाही. पण तीही हिमत नाही. 

Leave a Comment