
नागपूर, २१ – किडनीचा आजार म्हणजे औषधोपचाराची आयुष्यभराची सोबत अशा या भयावह आजाराचे प्रमाण भारतीयांमध्ये जास्त असल्याची माहिती जगप्रसिद्ध किडनी रोगतज्ज्ञ डॉ. नेयन लेव्हिन यांनी मंगळवारी दिली. एका व्याख्यानाकरिता आले असता पत्रपरिषदेत ते बोलत होते.
जगभरात किडनी रुग्णांची संख्या वाढत आहे. यात सगळ्यात जास्त रुग्ण आफ्रिकेत, तर सगळ्यात कमी रुग्ण दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये सापडतात. दक्षिण पूर्व आशियातील देशांच्या तुलनेने भारतात तसेच भारतीय उपखंडातील इतर देशांमध्ये या रुग्णांची संख्या अधिक आहे. दक्षिण आशियातील हवामानामुळे येथील जनतेच्या जिन्स मध्ये असलेल्या विशिष्ट गुणधर्मामुळे ही जनता किडनीच्या आजारांपासून दूर आहे. तसेच त्यांचा पौष्टिक आहारदेखील त्यांना अनेक रोगांपासून दूर ठेवतो. तसेच एखाद्या आजारातून बरे होण्याचे प्रमाणदेखील या लोकांमध्ये जास्त आढळून येते, अशी माहितीही त्यांनी दिली.
