यजमान संघाला प्रथमच आशिया चषक जिंकण्याची संधी

मीरपूर, दि. २१ – साखळी सामन्यात २०११ विश्वचषक विजेता आणि सी बी सीरीजमध्ये ऑस्टेलियाच्या तोंडचे पाणी पळवण्यार्‍या बलाढ्य श्रीलंका या ताकदवान संघाला हरवून बांगलादेशने दिमाखात आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारली आहे. आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते पाकिस्तान संघाचे. पाहुण्या पाकलाही चाँद दाखवून यजमान गुरुवारी आशिया चषक जिंकण्यासाठीच मैदानात उतरतील.
बांगलादेश संघ जर असाच खेळत राहिला तर आशिया खंडातून चौथा बलाढ्य संघ म्हणून नावारुपास येईल. विरोधकांच्या कच्च्या दुव्यावर पाय ठेवून त्यांनी विजयश्री खेचत आणली आहे. तमीम इक्बाल व नझिमउद्दीन या दोघा सलामीवीरांनी सुरुवातीपासूनच सर्वोत्तम फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात दिली आहे. शाकिब-अल-हसन व कर्णधार मुश्फिकर रहीम मधल्या फळीत येवून संघाला विजयापर्यंत नेले आहे. गोलंदाजीचा विचार केला तर मश्रफे मुर्तझा, नझिमउल हुसेन पाटा खेळपट्ट्यावर चांगली गोलंदाजी टाकत आहेत, त्याच्या साथीला अब्दुर रझाक व हसन फिरकीची मदार सांभाळणार आहेत.
दुसरीकडे २००० पासून आशिया चषक न जिंकलेला पाकिस्तान ही चषकावर नाव कोरण्यासाठी उत्सुक असेल. त्यांची सलामीवीर जोडी फार्मात असून फलंदाजीमध्ये संघ उजवा आहे तर गोलंदाजीत गचाळ कामगिरी करत आहे. भारताविरुद्ध् सामन्यात भारतीय फलंदाजांनी पाक गोलंदाजांची पिसे काढली होती. सईद अजमलला आयसीसीने क्लिन चीट दिल्याने गोलंदाजावरही प्रेशर असेल.
हे पाहता आशिया चषकावर कोणता संघ नाव कोरतो हे गुरुवारीच समजेल.

Leave a Comment