
पुणे दि.१७-देशात सर्वाधिक महाग सोने मिळणारे शहर अशी पुण्याची नवी ओळख निर्माण झाली असून त्यासाठी केंद्रीय अर्थंसकल्प आणि पुणे महानगरपालिका यांचा महत्त्वाचा हातभार लागला आहे.
पुण्याची ओळख अनेक प्रकारे करून दिली जाते. विद्येचे माहेरघर, पूर्वेचे ऑक्सफर्ड, पेन्शनरांचे शहर, दुचाकींचे शहर अशी पुण्याची ओळख यापूर्वीच प्रस्थापित झाली असताना आता ही नवी ओळखही पुण्याला मिळाली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सोन्यावरील सीमाशुल्कातील वाढ दोन टक्क्यांनी वाढवून ती चार टक्के केली आहे. पुणे महानगरपालिका सोन्यावर तीन टक्के जकात आकारते. शिवाय राज्य सरकारच्या १ टक्का व्हॅट व दोन टक्के इतर खर्च असे धरून पुण्यात सोने खरेदी करताना जागतिक बाजाराच्या तुलनेत १० टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. म्हणजेच अन्यत्र सोन्याचा भाव १० ग्रॅमला तीस हजार रूपये असेल तर पुण्यात तो तेहतीस हजार रूपये द्यावा लागणार आहे.
मुंबई महानगरपालिका सोन्यावर १०० रूपयामागे १० पैसे कर घेते तर पुण्यात हाच दर तीन रूपये आहे.. विशेष म्हणजे देशात महाराष्ट्र वगळता अन्य राज्यात सोन्यावर जकात आकारली जात नाही. पण महाराष्ट्रातही सर्वाधिक महाग सोने हवे असेल तर ग्राहकाला पुण्याला येऊन खरेदी करावी लागणार आहे आणि पुणेकरांना थोडे स्वस्त सोने हवे असेल तर पुण्याबाहेर जाऊन खरेदी करावी लागणार आहे. महाराष्ट्राबाहेर जाऊन सोने खरेदी केल्यास ती अधिक स्वस्त पडण्याची शक्यताही आहेच.
याचा बाकी परिणाम काय होईल तो होवो पण सोन्यावरील सीमा शुल्कात वाढ झाल्याने सोने तस्करीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत.
