पुणे दि.१७- कोथरूडच्या मयुर कॉलनीत मंगळवारी संध्याकाळी घरात घुसून हत्या करण्यात आलेल्या शोभा सेलारका यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या सुनेलाच अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घरातून स्टीलचा एक रॉडही जप्त केला आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी की मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास शोभा यांचा त्यांच्या राहत्या घरात खून झाला होता. त्यांच्या डोक्यावर, मानेवर, चेहर्यावर,हातावर शस्त्राने वार करण्यात आले होते. त्यांचा मुलगा उदय याने याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी या खुनाच्या तपासासाठी विशेष पथके स्थापन केली होती. खून करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून आरोपी परिचयातीलच कोणी असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला होता.
पोलिस उपायुक्त ज्ञानेश्वर फडतरे यांनी घटनास्थळी कांही महत्त्वपूर्ण दुवे हाती लागले असल्याचे सांगतानाच आरोपीला कुणीही पाहिले नसल्याने रेखा चित्र तयार न करता आल्याचेही सांगितले होते. मात्र खुनामागच्या तीनचार शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने पोलिस तपास सुरू होता. त्यातूनच हा खून शोभा सेलारका यांच्या सुनेनेच केला असल्याचे महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याने तिला अटक करण्यात आली आहे असे पोलिसांनी सांगितले. सेलारका यांचा मुलगा उदय हा शेअर ट्रेडिंगचे काम करतो तर सून आयडीबीआय इन्शुरन्सचे काम करते असेही समजते.
