खासदारकी व सत्तेतील योग्य वाटा न दिल्याने रिपाईची नाराजी- महायुतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार

मुंबई, दि. १७- रिपाई पक्षाने केलेल्या मदतीमुळेच शिवसेना – भाजपला महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत चांगले यश मिळाले. मात्र, युतीने महायुतीचा धर्म पाळला नाही. शिवसेनेने रिपाईचे नेते रामदास आठवले यांना राज्यसभेची खासदारकी देणे रिपाई कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. तसेच सत्तेतही चांगला वाटा द्यायला हवा होता. मात्र, तसे न झाल्याने रिपाई नेते व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ही नाराजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडे व्यक्त करणार आहोत, अशी माहिती रिपाईचे नेते व आमदार सुमंतराव गायकवाड यांनी दिली.
  रामदास आठवले मुंबई बाहेर असून पक्षात तीव्र नाराजी आहे. तसेच जोपर्यंत रिपाईची नाराजी दूर होत नाही तोपर्यंत शिवसेना – भाजपाच्या कोणत्याही कार्यक्रमांना रिपाई नेते उपस्थित राहणार नाहीत, असा इशारा रिपाईचे प्रवक्ते अर्जुन डांगळे यांनी दिला. ते मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
रिपाईच्या नाराजीने आता महायुतीवर २०१४ च्या निवडणुकांपूर्वीच नाराजीचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत. एवढेच नव्हे तर शिवसेना – भाजपाने मुंबई महापालिकेत केवळ एक वृक्ष प्राधिकरण समिती अध्यक्षपद व १६ प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीत जो काही वाटा देऊ केला आहे तो पक्षाला योग्य वाटत नाही. आम्हाला अपेक्षित सत्तेचा वाटा दिला गेला नाही. म्हणूनच आता वृक्ष प्राधिकरण समिती अध्यक्षपद आम्ही नाकारत आहोत, असेही डांगळे यांनी सांगितले.
पालिकेत स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट व अन्य समित्यांमध्येही आम्हाला नामनिर्देशित सदस्यत्व देखील दिले गेले नाही. त्यामुळे रिपाईचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत, असे ते पुढे म्हणाले.
  शिवसेनेबरोबर युती करताना रामदास आठवले यांना खासदारकी देण्याचा प्रस्ताव रिपाईने ठेवला नव्हता. दीर्घ पल्ल्याचे राजकारण, समाजकारण हा हेतू होता. पालिका निवडणुकीत रिपाईची युतीला चांगलीच मदत झाली. पण युतीची मदत रिपाईला झाली नाही, असे डांगळे म्हणाले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत. काँग्रेस आघाडीला राज्यातून तडीपार करणे हे आमचे धोरण आहे. त्यामुळे आम्ही महायुती तोडणार नाही. पण नाराजी व्यक्त करतोय. रिपाई तरीही महायुतीतच राहील असे अविनाश म्हातेकर यांनी सांगितले.

Leave a Comment