
नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यांनी 10 लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर देशात कोरोनाचा समूह संसर्ग (Community Transmission) सुरु झाल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) म्हटले आहे. याबाबतचे महत्वपूर्ण वक्तव्य इंडियन मेडिकल असोसिएशनचे बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के मोंगा यांनी केले आहे.
इंडियन मेडिकल असोशिएशनचा धक्कादायक दावा; देशात सुरु झाले Community Transmission
यावर भाष्य करताना डॉ. मोंगा म्हणाले की, देशात दररोज 30 हजारहून अधिक रुग्ण आढळून येत असून ही फार गंभीर स्थिती आहे. आता देशातील ग्रामीण भागात देखील हा संसर्ग सुरु झाला, याचा अर्थ असा आहे की, देशात कम्युनिटी ट्रांसमिशन सुरु झाल्याचे डॉ. मोंगा यांनी म्हटले आहे.
मोंगा यांनी पुढे म्हटले की, आता ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. आपण दिल्लीमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमधील दुर्गम भागात काय होणार? असे त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर कोरोना हा असा आजार आहे, जो खूप वेगाने पसरत असल्याचमुळे त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांनी संपूर्ण सावधगिरी बाळगली पाहिजे, तसेच केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे. या व्हायरल आजाराला रोखण्यासाठी 70 टक्के लोकसंख्येची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यावर लक्ष द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि ब्राझिलनंतर आता भारतात एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात आता कोरोनाबाधितांची संख्या दहा लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 10 लाख 77 हजार 618 लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 26,816 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 6 लाख 77 हजार 422 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासात कोरोनाचे 38 हजार 902 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 543 मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत अमेरिका, ब्राझिलनंतर तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेत 38,33,271 कोरोनाबाधित आहेत तर ब्राझिलमध्ये 20,75,246 वर कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला आहे.
