केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची माहिती; स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनाला सकारात्मक यश


नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी काल देशातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली असून कोरोना प्रतिबंधक लसीच्या सुरु असलेल्या संशोधनाला सकारात्मक यश येत असल्याची माहिती दिली आहे. स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीच्या क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्या असून आता मानवी चाचणी सुरू असल्याचेही चौबे यांनी सांगितले. या चाचण्या यशस्वी झाल्या तर संपूर्ण जगासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

त्याचबरोबर पीपी मॉडेलच्या मल्टीपल ब्लडसह आयजीजी अँटीबॉडी तपासणी मशीनद्वारे अवघ्या एका तासात रिझल्ट येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. काल पटना येथील एम्समध्ये फोन करुन कोरोनावरील लसी संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूसही त्यांनी केली. सोबतच त्या ठिकाणी काम करणारे वैद्यकीय कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांचीही माहिती घेतली.

पटना येथील एम्स रुग्णालयात पीपी मॉडेल वर विट्रोस ईसीआईक्यू (VITROS ECIQ) इम्यून डायग्नोस्टिक सिस्टम सँपल मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीनमुळे आयजीजी अँटीबॉडी टेस्ट आणि 3100 विविध प्रकारच्या ब्लडची तपासणी होणार आहे. यामुळे एका तासामध्ये ब्लड टेस्टचा रिझल्ट मिळणार आहे. ज्यामुळे प्लाझ्मा थरेपी आणि इतर तपासणी वेगाने करण्यात मदत होणार आहे. ही मशीन एम्समध्ये एका आठवड्यात बसवण्यात येणार आहे.

ही मशीन लहान क्लिनिक आणि ब्लड बँकेसाठी उपयुक्त ठरणार आहे. काही महिन्यांपासून कोरोना लसीवर सुरू असलेल्या संशोधनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. लसी यशासाठी आम्ही सर्वजण आशादायी असल्याचेही अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले. आयसीएमआरची पूर्ण टीम या सर्वावर लक्ष ठेऊन आहे. दोन टप्प्यात मानवी चाचणी होणार आहे.

या दरम्यान सुरक्षा आणि स्क्रीनिंगवर विशेष भर दिला जाणार आहे. लसीच्या प्रगतीबाबतही केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी विस्तृत चर्चा केली आहे. यावेळी संशोधक प्रोत्साहनही दिल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्री अश्विनी कुमार चौबे म्हणाले, की बिहार सरकार आरोग्य मंत्रालयाला हवी, ती मदत करायला तयार आहे. यापुढेही आवश्यक उपकरणे आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बिहार सरकार मोठ्या उपाययोजना करत आहे. केंद्रीय पथक बिहारमध्ये येऊन सध्याच्या परिस्थितीची माहिती घेणार आहे. या पथकासोबत केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी चर्चा केली आहे. बिहारमध्ये सध्या 20 ते 25 हजार टेस्ट होत आहे.