मराठमोळ्या तरुणाने बनवले SHAREitच्या तोडीस तोड अॅप


काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने ५९ चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालत, चीन सर्वात मोठा डिजीटल स्ट्राईक करत चीनला धक्का दिला होता. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्समध्ये शेअरइट, टीक-टॉक सारख्या अॅपचा देखील समावेश होता. याच दरम्यान पंतप्रधानांनी वोकल टु लोकलचा नारा देखील दिला होता.

पण यात नेटकऱ्यांची शेअरईट सारखे झटपट फाईल शेअर करणारे अॅप बंद झाल्यामुळे पंचाईत झाली. पण एका मराठमोळ्या तरुणाने याच संधीचा फायदा उचलत SHAREitच्या तोडीस तोड अॅप बनवले आहे. मुळचा यवतमाळच्या पुसदचा रहिवाशी असणाऱ्या तेजस तायडेने हे नवे अॅप बनवले आहे. या अॅपवर बंदी येण्याआधीच शेअरईटच्या तोडीस तोड भारतीय शेअरिंग अॅप बनवायचा, निर्धार तेजसने केला होता. त्यातच सरकारने चिनी अॅपवर बंदी घातल्यामुळे ही बंदी तेजसच्या पथ्यावर पडली. तेजसने या अॅपसाठी आपल्या टीमसोबत या अॅपच्या कामाला सुरुवात केली.

जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू होता, त्याच दरम्यान तेजस आपल्या टीमसोबत सेंडइट अॅपसाठी काम करत होता. तेजसला हे अॅप बनवण्यासाठी त्याच्या मित्रांनीही मदत केली. त्या दोघांचे प्रथमेश चोपडे आणि धीरज पाध्ये असे नाव आहे. हे अॅप पूर्णत्वास येण्यास ४ महिन्यांचा कालावधी लागला.

सध्याचा जमाना हा डिजीटल असल्यामुळे बहुतांश कामे ही मोबाईलद्वारेच होतात. त्यामुळे जितकी सुविधा तेवढाच धोका हा आलाच. त्यामुळे कोणतही अॅप वापरताना डेटासेफ्टीचा प्रश्न सर्वात आधी उद्भवतो. डेटासेफ्टीच्या तुलनेत सेंडइट अॅप हे शेअरइटपेक्षा सेफ असल्याचे तेजस सांगतो. शेअरइटच्या तुलनेत सेंडइटद्वारे अधिक वेगाने डेटा शेअर करता येणार, अशी माहिती तेजसने दिली.

12 जुलैपासून सेंडइट हा शेअरिंग अॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या हे अॅप अँड्रोईड युझर्ससाठी आहे. या अॅपचे सध्या 2.0 व्हर्जन उपलब्ध आहे. लवकरच हे अॅप आययोएस वापरकर्त्यांच्या सेवेत येणार आहे. याचे कामही अंतिम टप्प्यात सुरु आहे. सेंडइट हे अॅप अवघ्या काही तांसामध्ये हजारपेक्षा जास्त जणांनी डाऊनलोड केले आहे. शेअरइट या चिनी अॅपला पर्याय दिल्याने तसेच मराठी मुलांनी हे अॅप डेव्हलप केल्यामुळे तेजस आणि त्याच्या मित्रांचं सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Comment