
मुंबई : राज्य सरकारने ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आगामी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची परवानगी दिली आहे, त्याच प्रमाणे 1 ऑगस्ट रोजीच्या ‘बकरी ईद’च्या सणालाही साधेपणाने साजरा करण्यास परवानगी द्या. त्याचबरोबर या सणात महत्त्वपूर्ण म्हणजे कुर्बानीला देखील सरकारने सूट द्यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे. कॉंग्रेसच्या काही नेत्यांकडून मागील काही दिवसांपासून बकरी ईद साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.
गणेशोत्सवाप्रमाणेच ‘बकरी ईद’लाही साधेपणाने साजरी करण्याची परवानगी द्या
नसीम खान यांनीही या मागणीला समर्थन देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बकरी ईदचा सण साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यासोबतच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देखील महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हीच मागणी केली आहे.

नसीम खान याबाबत बोलताना म्हणाले की, सरकारने राज्यातील वेगवेगळे सण साजरा करण्याची परवानगी दिली आहे. मग बकरी ईदला का नाही? जसे विविध निर्बंध लावून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने बकरी ईद सणालाही द्या. 1 ऑगस्ट रोजी मुस्लीम समाजाचा अतिशय महत्त्वाचा सण असलेल्या ‘ईद ऊल अदाह’च्या दिवशी कुर्बानी देण्याची सूट आणि तशी व्यवस्था सरकारने करुन द्यावी. याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा.
मुस्लीम समाजात बकरी ईद या सणाला खूप महत्त्व असते. यादिवशी कुर्बानी देणे अनिवार्य असते. संपूर्ण जगात हा सण मुस्लीम बांधव दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासात साजरा करतात. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केल्याने अनेक सण आणि धार्मिक उत्सव साजरे करता आले नाहीत. असे असतानाही कोविड काळात काही शर्तींच्या आधारावर गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु बकरी ईद ह्या मुस्लीम समाजाच्या महत्त्वाच्या सणाविषयी आतापर्यंत सरकारकडून कोणताही निर्णय झाला नसल्याने मुंबईसह संपूर्ण राज्यातील मुस्लीम समाज आणि मुस्लीम संघटनामध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली आहे.
