उद्यापासून लातूरमध्ये नियम आणि अटींसह लॉकडाऊनची कडक अमंलबजावणी


लातूर : लातूर प्रशासन लॉकडाऊन अंमलबजावणीसाठी सज्ज झाले असून लातूरमध्ये लॉकडाऊनची अनेक नियम आणि अटींसह कडक अमंलबजावणी होणार आहे. त्याचबरोबर 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत किराणा दुकाने आणि भाजीपाला मार्केटसुद्धा या लॉकडाऊनदरम्यान बंद राहणार आहे.

मागील दहा दिवसांत लातूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे सर्वच स्तरातून लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी जोर धरत होती. लातूर शहराचा विचार केल्यास 100 कंटेन्मेंट झोन तयार झाले होते. तसेच ग्रामीण भागात ही रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले होते. 720 पेक्षा जास्त कोरोना बधितांची संख्या जिल्ह्यात गेली आहे. 33 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना याबाबत सतत विचारणा होत होती. मात्र प्रशासन अटी आणि नियमानुसार सर्व व्यवहार सुरळीत सुरु रहावेत यासाठी प्रयत्नशील होते.

लॉकडाऊनबाबत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत निर्णय होऊ लागले. पुण्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे त्या भागातील लोक लातूर जिल्ह्यात आल्यास संसर्गचा धोका वाढू शकतो. हे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळेच लातूर जिल्ह्यातसुद्धा लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली होती.

लॉकडाऊन 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत असणार आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक करण्यात येणार आहे. याबाबत काय मार्गदर्शक सूचना आणि नियम असतील यावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक लातुरात पार पडली. या बैठकीत लॉकडाऊनबाबत काही मार्गदर्शक सूचना आणि नियम तयार करण्यात आले आहेत. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून नियमाचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती लातूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

लातुरसाठी अशी आहे नियमावली :

 • दिनांक 15 ते 30 तारखेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
 • लातूर जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, ठोक आणि किरकोळ विक्री दुकाने 15 ते 20 तारखेपर्यंत संपूर्ण बंद असणार आहेत. 21 ते 30 तारखेपर्यंत या ठिकाणावरून फक्त होम डिलिव्हरी करण्याची सूट असेल. ग्राहकांना दुकानात येता येणार नाही. यासाठीसुद्धा वेळेचे बंधन असणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंतच होम डिलीवरी करता येणार आहे.
 • दवाखान्याजवळील मेडिकल दुकाने नेहमीप्रमाणे सुरु राहतील. इतर ठिकाणची मेडिकल दुकाने ठराविक वेळेत चालू राहतील.
 • झोमॅटो, स्वीगी आणि इतर हॉटेल मधील खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या सेवा 15 ते 30 तारखेपर्यंत संपूर्णतः बंद असणार आहेत
 • सार्वजनिक ठिकाणी, उद्याने बंद राहणार आहेत. तसेच सकाळ संध्याकाळ फिरायला जाण्यावर ही बंदी घालण्यात आली आहे.
 • उपहारगृह, हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, मॉल बाजार हे संपूर्णता बंद असतील.
 • केशकर्तनालय, ब्युटी पार्लरही पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहेत.
 • मोंढा, कृषी उत्त्पन्न बाजार समिती, भाजी मार्केट, आठवडी बाजार, दैनंदिन बाजार, फेरीवाले यांचे सर्व व्यवहार 15 ते 20 तारखेपर्यंत संपूर्णता बंद असणार आहेत. मात्र 21 ते 30 तारखेपर्यंत ठोक भाजी बाजार, फळ बाजार सुरु राहतील.
 • 10 वाजेपर्यंतच भाजी फळे विक्री घरपोच करण्यात येणार आहे. स्टॉल लावून विक्री करता येणार नाही.
 • मास, मटण, अंडी, चिकन यांची दुकाने 15 ते 20 तारखेपर्यंत बंद असणार आहेत. 21 ते 30 तारखेपर्यंत सकाळी सात ते बारा यावेळेतच सुरु राहणार आहेत.
 • सार्वजनिक आणि खासगी दुचाकी तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना बंदी असेल. फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट असेल.
 • सर्व प्रकारची बांधकामे बंद असणार आहेत. बांधकामांवर निवासाची सोय असेल त्या ठिकाणी नियम पाळून बांधकाम करता येईल.
 • वर्तमानपत्रे छपाईची परवानगी आहे. वितरण मात्र सकाळी 6 ते 9 यावेळेतच करावे लागणार आहे.
 • शेतीसाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री पुरवठा करणारी दुकानं सकाळी सात ते बारा यावेळेत सुरु राहतील.
 • शेतकऱ्यांना अडचण होऊ नये यासाठी पीक विमा बांधावर भरता येणार आहे. यासाठी कृषी विभागातील कर्मचारी मदत करणार आहेत.

Leave a Comment