सोलापूरत पावसाने विश्रांती घेतल्याने गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना

सोलापूर दि.०२ सप्टेंबर-श्री गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या दिमाखात स्वागत करीत गुरूवारी घरोघरी तसेच गल्लीबोळातील सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार बरसत असलेल्या पावसाने गरुवारी विश्रांती घेंतल्याने सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांसह बालगोपाळांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
 श्रीगणेश उत्सवाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. गणेशोत्सवासाठी मूर्तीशिवाय सजावटीचे साहित्य लागते. या साहित्याच्या किमतीही १५ ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. किमती वाढल्या तरी त्याचा खरेदीवर परिणाम झालेला दिसला नाही. गणेश मंडळाचे कार्यकर्ते जागोजागी सजावटीचे साहित्य खरेदी करताना दिसून आले.
शहरात सकाळी ७ वाजल्या पासूनच गणरायांच्या आगमनासाठी नागरिक गणेशमूर्ती घेण्यासाठी बाजारात आले होते. सकाळीच सुरू झालेल्या खरेदीमध्ये चिमुकल्यांसह वयोवृध्दही सहभागी झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष संपूर्ण शहरात दुमदुमला होता. गुलाल आणि पुष्पांची उधळण करीत गणरायाला घरी नेण्यात आले. दिवसभर चालणार्‍या या धामधुमीत शहरातील बाजारपेठा फुलून गेल्या होत्या.श्रीगणेश चतुर्थीनिमित्त मागणी वाढल्याने बाजारपेठेत मोदकांच्या दरात वाढ झाली होती. मँगो, ऑरेंज, पिस्ता, स्ट्राबेरी, व्हेनीला अशा विविध चवींमध्ये मोदक विक्रीस उपलब्ध होते. मोदकांचे दर २२० रुपयांपासून २६०रूपयांपर्यंत होते.
 गेल्या १५ दिवासांपूर्वी दुधाच्या दरात वाढ झाल्याने खव्याच्या दरातही वाढ झाली आहे. परिणामी मोदकांच्या दरात नाईलाजाने वाढ करावी लागत असल्याचे सांगण्यात आले. पूजेस लागणार्‍या गणपतीस प्रिय असलेल्या  दूर्वा, आघाडा, मक्याचे कणीस, सीताफळे, सफरचंद, मोसंबी, चिक्कू, आंब्याची पाने, अष्टगंध, बुक्का, जानवे, चुनरी, फेटा, गणपती बप्पा मोरया रिबीन, टोपी, जास्वंद, गुलाब, तुळस, गुलछडी, मोगरा, फुलांच्या माळांची गणेशभक्तांकडून खरेदी करण्यात येत होती. त्याचप्रमाणे गणेशाचे आसन, मागे फिरणारी चके्र, निरनिराळ्या रंगांच्या लुकलुकणार्‍या लाईटच्या माळा तसेच कागदी व इतरप्रकारची फुले, झुरमुळ्या, थर्माकोलची आर्कषक मखरे, फुलदाण्या आदी सजावटीच्या वस्तू खरेदी करण्याकडे बालगोपाळांसह महिला वर्गानेही गर्दी केली होती. गतवर्षीपेक्षा प्रत्यके वस्तूमागे १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी विक्रीवर मात्र कोणताही परिणाम झाला नसल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.
यंदा सराफ बाजारात देखील चांदीच्या गणेशमूर्तीसह भक्तांनी चांदीचे मोदक, जानवे, दूर्वा, मुकुट, हार, त्रिशूल यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली असल्याचे सुरेश बिटला यांनी सांगितले.