भारतीय क्रिकेटपटू गाढव – नासीर हुसेन

नवी दिल्ली दि.०२ सप्टेंबर- इंग्लंडविरूद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंचे क्षेत्ररक्षण पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन याने भारतीय क्रिकेटपटूंची तुलना गाढवाशी केली आहे. हुसेनच्या या वक्तव्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीका करीत तीव्र आक्षेप घेतला आहे.

मँचेस्टर येथे झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० सामन्याचे  समालोचन करताना हुसेन यांनी भारतीय क्रिकेटपटूंना गाढव म्हटले होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. हुसेन यांचे वक्तव्य माध्यमांमध्ये मोठया प्रमाणात चर्चेत आल्याने याबाबत बीसीसीआय नक्कीच  कारवाई करेल. प्रत्येक खेळाडूला भाष्य करण्याचा अधिकार असला तरी,समालोचकाने अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. मुनाफ पटेलच्या गोलंदाजीवर केवीन पीटरसनचा झेल पार्थिव पटेलने सोडल्यानंतर हुसेन यांनी भारतीय क्रिकेटपटूंना गाढव म्हणून संबोधले होते. हुसेन यांच्या या वक्तव्यावर भारताच्या माजी खेळाडूंनी देखील टीका केली आहे.

याबाबत स्पष्टीकरण देताना हुसेन म्हणाले, मी फक्त दोन्ही संघातील क्षेत्ररक्षणामध्ये किती फरक आहे हे सांगत होतो. इंग्लंडचे खेळाडू सर्वच पातळीवर चांगली कामगिरी करत असताना भारतीय क्रिकेटपटूं च्या खराब कामगिरीवर माझा विश्वास बसत नव्हता. भारतीय संघात ३ किं वा ४ चांगले खेळाडू असून, एक- दोन जण क्षेत्ररक्षण करताना गाढवासारखे वागतात, असे म्हणत नासिरने आपल्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला.    

Leave a Comment