भावगीतांच्या संगीताचा बादशहा श्रीनिवास खळे यांचे निधन

ठाणे दि.०२ सप्टेंबर- मराठी माणसाचे रक्त सळसळवणार्‍या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे संगीतकार आणि भावगीतांच्या संगीताचे बादशाहा श्रीनिवास खळे यांचे गुरूवारी मध्यरात्रीनंतर (शुक्रवारी पहाटे) त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. शुक्रवारी दुपारी ठाण्याच्या जवाहरबाग येथील स्मशानभूमीत त्यांना चाहत्यांच्या, परिजनांच्या आणि शिष्यांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला.

‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘गोरी गोरी पान फु लासारखी छान’, ‘आनंदाचे डोही’, अशी एकापेक्षा एक सुरेल भावगीते महाराष्ट्राच्या घराघरात खळे यांनी पोहोचवली. श्रीनिवास खळे हे भावगीत, प्रबोधनगीतांचे बादशहा होते. त्यांच्या निधनाने भावगीतांच्या संगीतात न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याची खंत त्यांच्या शिष्य आणि चाहत्यांनी व्यक्त केली.

श्रीनिवास खळे  यांचा ३० एप्रिल १९२६ साली वडोदरा येथे जन्म झाला. त्यांच्या मागे पत्नी वसुमती व मुली रमा, संजीवनी आणि सोनाली असा परिवार आहे. ठाण्याच्या वसंत विहार येथील जस्मीन टॉवरमध्ये ते भाडयाने राहत होते. काही दिवसापुर्वी श्रीनिवास खळे यांना कावीळीची लागण झाल्याने त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रूग्णालयात १५ दिवस उपचार करण्यात आले होते. आपल्या संगीत प्रवासाच्या कारकिर्दीत त्यांनी  एकापेक्षा एक सुरेल आणि मनाला भिडणार्‍या भावगीतांची मालिका मराठी रसिकांना सादर केली. त्यांनी काही चित्रपटांना देखील संगीत दिले होते.  ‘जिव्हाळा’ आणि ‘ बोलकी बाहुली’ या चित्रपटांप्रमाणेच, यंदा कर्तव्य आहे, पळसाला पाने तीन, सोबती, पोरकी, लक्ष्मीपूजन आदी मराठी चित्रपटांचे संगीत श्रीनिवास खळे यांनीच दिले होते. पाणीग्रहण, विदूषक, देवाचे पाय अशा विविध नाटकानाही खळे यांनीच संगीत दिले. त्यांचे संगीत केवळ कानाला नाही तर मनाला देखील भिडणारे होते.

ज्येष्ठ संगीतकार आणि भावगीतांचा बादशहा श्रीनिवास खळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिनीधी राज्यमंत्री राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी आबासाहेब जर्‍हाड, भाजपा आमदार विनोद तावडे यांच्यासह शेकडो चाहत्यांनी गर्दी केली होती. याशिवाय शंकर महादेवन, सुरेश वाडकर, देवकी पंडीत या त्यांच्या शिष्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात विशेषतः भावगीताच्या संगीतक्षेत्रात मोठी उणीव भासणार आहे, असे शंकर महादेवन म्हणाले. महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी देखील श्रीनिवास खळेंना श्रद्धांजली वाहिली. रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी खळे काका  देवाच्या राज्यातून आले होते असे राज्यपाल म्हणाले.

1 thought on “भावगीतांच्या संगीताचा बादशहा श्रीनिवास खळे यांचे निधन”

Leave a Comment