
न्यूयॉर्क दि.२४ ऑगस्ट – सिरियाचे राष्ट्रध्यक्ष बसर आसद, त्यांचे कुटूंबीय आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्याविरूद्ध निर्बंध लादले जावेत, अशी मागणी संयुक्त राष्ट्रामध्ये पाश्चिमात्य देशांनी तयार केलेल्या एका ठरावामध्ये बुधवारी करण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये लवकरच हा ठराव मतदानासाठी मांडण्यात येणार आहे. मात्र हा ठराव संमत होणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पश्चिमी देशांच्या या प्रस्तावाला रशियाने विरोध दर्शविला आहे. सीरियावर निर्बंध घालणे हा समस्येचा तोडगा नसल्याचे रशियाने म्हटले आहे. रशिया सुरक्षा समितीचा आजीव सदस्य असून रशियाच्या परवानगीशिवाय हा प्रस्ताव संमत होणार नाही. बसर असद यांच्या राजवटीविरोधात सिरियामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत २२०० जणांचा मृत्यू झाला असल्याचे संयुक्त राष्ट्रानी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियन आणि अमेरिका यांनी हा ठराव आणला आहे.
