
जगातले सर्वात महाग घर म्हणजे मुकेश अंबानीचे अँटीलियो हे घर आता अनेक प्रकारच्या वादात सापडले आहे कारण मुळात ज्या जागेवर हे २७ मजली घर उभे आहे ती जागा नेमकी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहेच पण या घराच्या खर्चिकपणा वरून निर्माण झालेला वैचारिक वादही जारी आहे. हे घर एक एकर आठ गुंठे जागेवर उभे आहे. मुंबईच्या अल्टामोंट रोडवर आहे. आज मबईत जागांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. ही जागा पूर्वी कधी तरी हजारभर रुपयांना एकर या भावात खरेदी केली असेल पण आता एका चौरस फुटाला दहा हजार रुपये लागत आहेत. अल्टामोंट रोड हा जगातला दहाव्या क्रमांकाचा महाग रोड समजला जातो. अशा या रस्त्यावर इमारत बांधायची म्हटले की वाद होणारच कारण आता जागेला सोन्याची किमत आली आहे. ही जागा वक्फ बोर्डाची आहे. वक्फ बोर्ड ही मुस्लिमांच्या धार्मिक कामांसाठी राखून ठेवलेल्या जागांचे नियंत्रण करीत असते. या जागा सरकारने दिलेल्या असतात आणि बोर्ड केवळ त्या जागांचे रक्षण करीत असते. पण अंबानीच्या या इमारतीसाठी वापरलेली जमीन या बोर्डाने अंबानीला विकून त्याच्याकडून भक्कम रक्कम घेतली आहे.
