पुण्यात सीसीटिव्ही कॅमेरे मागणीत लक्षणीयरित्या वाढ

पुणे – मुंबईत नुकत्याच झालेल्या तीन बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सीसीटिव्ही कॅमेरे व अन्य सुरक्षा उपकरणांच्या मागणीत लक्षणीयरित्या वाढ झाली असून या व्यवसायात गेल्या महिन्यात किमान ३० टक्के वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
  या क्षेत्रातील वितरकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्परेट हाऊसेस, हॉटेल्स, मॉल्स, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, दुकाने, गृहरचना संस्था, बंगले तसेच छोट्या मोठ्या दुकानदारांकडून या सुरक्षा उपकरणांसाठी विचारणा सातत्याने वाढत चालली असून ही उपकरणे खरेदी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. आनंद इन्फोसिस्टिमचे व्यवस्थापकीय संचालक प्रितम भापेवरा यांनी दिलेल्या माहितीनुसार विचारणा करणार्‍या ग्राहकांपैकी बहुतेकांची पसंती सीसीटिव्ही कॅमेर्‍यांनाच असल्याचा अनुभव येत असून १३ जुलै २०१० ला येथील जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटानंतरही सुरक्षा उपकरणांची मागणी अशीच वाढली होती.
   या उपकरणांत १ महिन्याचे रेकॉर्ड ठेव शकणार्‍या सीसीटिव्ही कॅमेर्‍यांना ग्राहकांची अधिक पसंती असली तरी ग्राहकांच्या गरजेनुसार या कॅमेर्‍यात बदल करता येतात असे सांगून ते म्हणाले की या कॅमेर्‍यांच्या किमती १५०० रूपयांपासून २ लाख रूपयांपर्यंत आहेत. सर्वसाधारणपणे पाच ते दहा हजार रूपयांच्या कॅमेर्‍यांची मागणी जास्त आहे. कॅमेर्‍यांबरोबरच हातात सांभाळता येतील अशा धातुशोधक यंत्रांनाही मागणी असून बहुतेक कंपन्या, महाविद्यालये, कार्पोरेट ऑफिसांच्या प्रवेशद्वारावर ही उपकरणे अधिक उपयुत्त* ठरतात असेही ते म्हणाले. शाळा, महाविद्यालये यांची मागणी मोठी आहे तर शहरातील सुप्रसिद्ध दगडूशेट गणपती मंदिर, कांही चर्चेस व अन्य धार्मिक स्थळांवरही मोठ्या संख्येने असे कॅमेरे बसविले गेले आहेत. आगामी गणेशेात्सवासाठी गणेश मंडळांकडूनही सध्या या कॅमेर्‍यांसाठी विचारणा होत असून कांही कंपन्यांनी हे कॅमेरे भाडेतत्त्वावर देण्याच्या योजनाही सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment