
भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांना पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या व्यथा,वेदना सांगण्यासाठी पाचारण केलेले आहे.अशा बैठकीमध्ये मुंडे पक्षश्रेष्ठींना निरुत्तर करतील आणि आपल्यावर कसा अन्याय होत आहे याचा पाढा वाचतील तेव्हा पक्षश्रेष्ठींना बचावाचा पवित्रा घ्यावा लागेल,असे कालपर्यंत समजले जात होते .परंतु परिस्थिती आता बदललेली आहे.मुंडे आता बचावाच्या पवित्र्यात आले आहेत आणि पक्षश्रेष्ठीच आक्रमक होऊन त्यांना आता फैलावर घेण्याच्या मनःस्थितीत आलेले आहेत. मुंडे यांनी महाराष्ट*ा तल्या आपल्या कथित जनाधाराचा नको एवढा भरवसा बाळगून आणि चुकीच्या सल्लागारांच्या सल्ल्याने जे बंड केले होते ते जवळजवळ फसल्यात जमा आहे. आता गोपीनाथ मुंडे यांना पक्षश्रेष्ठींसमोर आपल्या वेदना सांगायच्या आहेत, परंतु त्या जेव्हा सांगितल्या जातील तेव्हा त्या किरकोळ आहेत हे त्यांच्याच लक्षात येईल आणि ज्या काही किरकोळ वेदना असतील त्या वेदना त्यांच्या अहंमन्य स्वभावातून निर्माण झालेल्या आहेत हेही त्यांच्याबरोबरच पक्षश्रेष्ठींच्याही ध्यानात येईल. संवाद कौशल्यामध्ये एक धडा दिला जातो. त्यामध्ये विचार करून बोला, असे सांगितले जाते. खरे म्हणजे हे सांगण्याची काही गरज नाही. परंतु सर्वसाधारणपणे लोक विचार न करता बोलतात आणि बोलल्यानंतर त्यांच्यावर विचार करण्याची पाळी येते. कारण ते अविचाराने बोललेले असतात आणि बोलण्याचे परिणाम दिसायला लागताच आता यातून बाहेर कसे पडावे यासाठी त्यांना नंतर विचार करत बसावे लागते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर अशी पाळी आलेली आहे. आपण पक्षात नाराज आहोत, असे त्यांनी जाहीर करून टाकले आणि अनेक नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. त्यातून मुंडे आता पक्षाच्या बाहेर पडणार, या चर्चेला वेग आला. आता मुंडे थोडेसे सावध झाले आहेत आणि आपण पक्षातून बाहेर पडणार नाही, असे म्हणायला लागले आहेत. एवढे करून ते थांबलेले नाहीत तर त्यांनी आपण पक्षातून बाहेर पडणार असा प्रचार आपल्याच पक्षाचे लोक करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला आहे. थोडा बारकाईने विचार केला तर यामध्ये त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा काही दोष नाही. असेल तर त्यांचा स्वतःचाच दोष आहे. कारण त्यांनी माध्यमांसमोर आपण नाराज आहोत, असे जाहीर करून टाकले आणि नंतर भुजबळ तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याशिवाय आपल्या समर्थक आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या. अशा वेळी ते इतर पक्षात जाण्याच्या विचारात आहेत असा अर्थ कोणी काढला तर त्यात चूक काय? तेव्हा मुंडेंच्या इतर पक्षात जाण्याची चर्चा मुंडेंनीच सुरू करून दिलेली आहे. यात काही शंका नाही. परंतु आता मात्र त्यांच्यावर नमते घेण्याची वेळ आली आहे. कारण त्यांच्यासाठी अन्य पक्षाची कवाडे बंद आहेत.
