सोलापूर दि.२८ मार्च – पुढील महिन्यात एप्रिलच्या रखरखीत उन्हाळ्यात सुट्ट्यांचा पाऊस पडल्याची अनुभूती येणार आहे.मार्च एंडमुळे आर्थिक हिशेब पूर्ण करण्याचा ताण,शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परिक्षांमुळे विद्यार्थी,पालक,गुरुजन यांची गडबड,अशा तणावात संपूर्ण महिनाभरात अकरा सुट्ट्या म्हणजे अशा सर्व मंडळींसाठी मोठा आधारच आहे.उन्हाळा तसा कडकडीत असतो.त्यामुळे घराबाहेर पडणे म्हणजे एक दिव्यच असते.या पार्श्वभूमीवर पालकांनी,चाकरमान्यांनी नियोजन केले तर रखरखीत उन्हापासून थोडी सुटका करून घेण्यासाठी नागरिकांना प्रवासही आखता येईल. ४, १२, १४, १६ आणि २२ एप्रिलमध्ये पाच सण, उत्सव आले असून त्यासाठी शासनाने सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
रखरखत्या एप्रिलच्या उन्हाळ्यात सुट्ट्यांचा पाऊस
याशिवाय ९ आणि २३ एप्रिलला दुसरा व चौथा शनिवार आहे. तर ३, १०, १७, २४ रोजी रविवार आला आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी-कर्मचारी या चाकरमानी व विद्यार्थ्यांची चंगळच आहे. सोमवार दि. ४ एप्रिलला गुढीपाढवा म्हणजे हिदू नववर्षदिन आहे. त्यामुळे रविवार, सोमवार अशा दोन सलग सुट्ट्या आहेत. १२ एप्रिलला रामनवमी आहे आणि एक दिवसाच्या अंतराने १४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. पुन्हा १६ तारखेला महावीर जयंती आली आहे. २२ एप्रिल रोजी गुडफ्रायडे आहे. चांगले नियोजन केल्यास दुसरा शनिवार ९ एप्रिलपासून १६ एप्रिलपर्यंत संपूर्ण आठवडाभर सुटीचा आनंद उपभोगता येईल.
या आठवड्यात फक्त तीन दिवस कामकाज सुरू राहणार आहे. तसेच एप्रिलच्या ३० दिवसांमध्ये ११ सुट्ट्या गेल्यामुळे १९ दिवस कामकाजाचे आहेत. या काळात मोठी गैरसोय होईल व्यापारी, उद्योजकांची. कारण सुट्ट्यांमुळे बँकांही बंद राहणार आहेत. त्याचा आर्थिक उलाढालीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या महिन्यातील सर्व पाचही सुट्ट्याचे सण, उत्सव सार्वजनिक स्वरूपाचे आहेत. बंदोबस्तामुळे याचा मोठा ताण पोलीस खात्यावर पडणार आहे. त्यांना थोडीशीही उसंत मिळणार नाही. अशाच प्रकारे सुटट्यांचा पाऊस यंदाच्या वर्षी ऑगस्ट (९ सुट्ट्या), ऑक्टोबर (१० सुट्ट्या), नोव्हबर (८ सुट्ट्या) महिन्यात पडणार आहे. या काळात सुट्ट्यांचा पाऊस आहे तर जून महिना कोरडा ठणठणीत आहे. या महिन्यात एकही सार्वजनिक सुटी आलेली नाही.
