अजमल कसाबलाही क्रिकेट सामन्याची तिकीटे द्यावीत – शिवसेनाप्रमुखांचा टोला

मुंबई दि.२८ – भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोहाली येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी यांना बोलाविण्याच्या प्रकाराची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शैलीत खिल्ली उडविली आहे.या सामन्यासाठी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब यालाही तिकीटे द्यावीत,असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना दैनिकातील संपादकीयमध्ये म्हटले आहे.

क्रिकेट डिप्लोमसीची खिल्ली उडवित शिवसेनाप्रमुख पुढे म्हणतात की, भारतातील पाकिस्तानच्या सामन्यांबाबत शिवसनेने आपली शस्त्रे पारजली आहेत. पाक पुरस्कृत अतिरेकी हल्ल्यात जे निरपराध लोक मारले गेले. जे सैनिक शहीद झाले, त्यांच्या बलिदानावर टाकलेल्या या मुजोर गुळण्या आहेत. गिलानी आणि झरदारी यांना क्रिकेट पाहण्यासाठी आमंत्रण देणे हा काहीजणांना शांतीचा पैगाम वाटतो पण सैतान कधी गीता वाचेल काय. याआधीसुध्दा पाकचे अनेक राष्ट्रपती व पंतप्रधान भारतात क्रिकेटचे सामने पहायला आले होते. म्हणून त्यांनी भारतातील अतिरेकी कारवाया थांबविल्या नाहीत. उलट त्या वाढतच गेल्या. संसदेवर हल्ला करण्यात आला. दिल्ली-मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. कारगिलचे युध्द झाले. कसाब व टोळीने मुंबई शहरात घुसून निरपराध लोकांवर हल्ला केला.

झिया उल हक, मुशर्रफ हेही भारतात क्रिकेट पहायला आले होते. पण त्यांचे मतपरिवर्तन झाले काय, असा सवाल उपस्थित करुन ठाकरे पुढे म्हणतात की, आता झरदारी आणि गिलानी यांना बोलाविले आहेच मग मनमोहन सिंग यांनी तिहार तुरुंगात असलेला अफझल गुरु व ऑर्थर रोड तुरुंगात असलेला कसाब यांनाही भारत-पाक सामन्याची दोन विशेष तिकीटे पाठवून दिली पाहिजेत. त्यांच्यावर अन्याय कशासाठी करता.

Leave a Comment