जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 65.62 लाखांच्या घरात


मुंबई : जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसचा कहर अद्याप कायम असून जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 65.62 लाखांच्या घरात पोहचली आहे. जगातील 213 देशांमध्ये मागील 24 तासात जवळपास एक लाख 21 हजार नवीन कोरोनाबाधित समोर आले आहेत, तर कोरोनामुळे 24 तासात 4927 जणांचा बळी गेला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील 65 लाख 62 हजार लोकांना जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 86 हजार वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरातील 31 लाख रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 13 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 49 लाखांच्या घरात आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात सातव्या स्थानावर आहे. भारतात कोरोनाचे 2,16,919 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 6,088 बळी गेले आहेत. सध्या भारतात 1,06,724 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 1,04,107 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका जगात अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत.

अमेरिकेतीस 19,01,783 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर 1,09,142 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 39,728 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,79,856 एवढी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये 5,83,980 कोरोनाबाधित आहेत तर 32,547 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 27,128 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,87,406 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,601 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,33,836 हजार एवढा आहे.

Leave a Comment