अमेरिकेत भारतीय राहुल दुबे रातोरात का झाले ‘Cult हिरो’

अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीची श्वेत पोलिसाद्वारे झालेल्या हत्येनंतर देशभरात हिंसाचार सुरू आहे. ब्लॅक लाईव्ह मॅटर्सच्या निदर्शकांना आश्रय देणारे भारतीय वंशाचे अमेरिकन राहुल दुबे एका रात्रीत हिरो झाले आहेत. वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लागल्यानंतर जवळपास 60 लोकांना आपल्या घरात आश्रय देत राहुल दुबे यांनी निदर्शकांना पोलिसांपासून वाचवले. या कामासाठी त्यांचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहेत.

वॉशिंग्टनच्या रस्त्यावर निदर्शन करणाऱ्या अनेकांना पोलीस अटक करत होते. मात्र पोलीस पाठलाग करत असताना देखील दुबे यांनी या निदर्शकांना आपल्या घरात आश्रय दिला. दुबे यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी निदर्शकांना आपल्या घरात घेतले त्यावेळी पोलीस केवळ दोन घर लांब होते.

एका 22 वर्षीय निदर्शकाने सांगितले की, दुबे हे स्वतःचा विचार न करता इतर सर्वजण सुरक्षित कसे राहतील हे पाहत होते. आम्हाला आमच्या अधिकारांबाबत सांगत, रात्रभर आमचे मनोबल वाढवत होते.

दुबे यांनी सांगितले की, या निदर्शकांवर पेपर स्प्रेचा वापर केला होता. त्यामुळे घरात आल्यानंतर 10 मिनिटे ते खोकत आणि डोळे चोळत होते. काहीजण जिन्यावर पडले सुद्धा, मात्र त्यांचे मित्र त्यांना मदत करत होते. अनेकादा पोलिसांनी त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी निदर्शन करणाऱ्यांचे घरात स्वागत आहे, असे पोलिसांना सांगितले. तेथे सर्वत्र प्रेम होते. गडद अंधारात रात्री 3 वाजता जेव्हा काहीजणांची झोपण्याची वेळ होती, ते झोपले नाहीत. हेच सर्वात सुंदर होते, असे दुबे म्हणाले.

सोशल मीडियावर नेटिझन्स राहुल दुबे यांच्या या कार्याचे कौतुक करत त्यांना खरे हिरो असल्याचे म्हणत आहेत.

Leave a Comment