नागपूर १६ मार्च – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून नवे गोंडवाना विद्यापीठ बनविण्यासाठी कर्मचारी आणि इतर मालमत्ता हस्तांतरणाचा प्रस्ताव विद्यापीठाने तयार करून राज्य शासनाकडे सादर केला आहे.लवकरच याबाबत निर्णय होईल आणि गोंडवाना विद्यापीठ स्थापनेच्या दिशेने पुढे जाता येईल अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी दिली.
नागपूर : गोंडवाना विद्यापीठाचा प्रस्ताव तयार
कुलगुरुपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी कुलगुरू डॉ. सपकाळ यांनी मंगळवारी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध उपक्रमांची माहिती देत पत्रकारांशी मनमोकळी चर्चा केली. पदभार स्विकारल्यावर आपण विद्यापीठाच्या सर्व कामकाजाला आढावा घेऊन कामाला सुरुवात केली आहे. विद्यापीठात खूप काही करायचे आहे, असे सांगून तातडीने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. विद्यापीठात लवकरच विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना सुरू केली जाणार असून विद्यापीठ परिसर, प्रशासकीय भवन आणि परिधा भवन या तिन्ही ठिकाणी ही योजना राबवण्यात येईल. विद्यापीठातील रिक्त पदे प्राधान्यक्रमाने भरली जातील, परिक्षांचे नियोजनही केले जाईल इत्यादी माहिती त्यांनी दिली. पीएचडीसाठी नवे नियम लवकरच लागू केले जातील अशी माहिती देऊन सध्याच्या पीएचडीच्या अर्जांचा निकाल लवकरात लवकर लावू असे डॉ. सपकाळ यांनी सांगितले. विद्यापीठात परमाणू जैविक शास्त्र, एरोनॉटिकल इंजिनिअरींग असे अभ्यासक्रम सुरू होत असल्याचे ते म्हणाले.
