नागपूर : लष्करी जवानांना उच्च शिक्षणाची संधी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा उपक्रम

नागपूर १६ मार्च – नवी दिल्लीतील काश्मीर हाऊसमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आर.कृष्णकुमार आणि संरक्षण लेफ्टनंट जनरल व्ही.के.चतुर्वेदी यांच्यात मंगळवारी झालेल्या करारामुळे लष्करी जवानांना सीमेवर कार्यरत असताना उच्च शिक्षण घेता येईल.लष्करी जवानांना खोळंबलेले शिक्षण मुक्त विद्यापीठाद्वारे पूर्ण करून आपली उच्च शिक्षणाची अभिलाषा पूर्ण करता येईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कृष्णकुमार सांगितले.

संरक्षण दलात प्रवेश घेताना जवानांचे वय १७ ते २१ इतके असते. त्यांचे कामाचे स्वरूप कडक शिस्तीचे आणि अत्यंत खडतर परिस्थितीचे असल्यामुळे सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही. त्यामुळे जवानांना आपले शिक्षण तेथेच थांबवावे लागते. उच्च शिक्षण नसल्यामुळे जवानांना सेवानिवृत्तीनंतर सुरक्षारक्षक किवा वॉचमन यासारख्या कनिष्ठ पदावर कार्य करावे लागते. या करारामुळे लष्करी जवानाला कार्यरत असलेल्या ठिकाणी मुक्त विद्यापीठाद्वारे उच्च शिक्षण घेता येईल. अध्ययनासाठी विनामूल्य पुस्तके दिली जाणार आहे. देशात विद्यापीठाचे ४४ अभ्यासकेंद्रे स्थापन होत असल्याचे सहयोग केंद्राच्या संचालिका डॉ. अनुराधा देशमुख यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे आणि कर्नल मलिक यावेळी उपस्थित होते.