गोवा : श्रेष्ठींच्या आदेशावरूनच त्या दोन मंत्र्यांचा राजीनामा – राष्ट्रवादी काँग्रेसचा खुलासा

पणजी १६ मार्च – गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जुझे फिलीप डिसोझा व निळकंठ हळर्णकर यांनी पक्षश्रेष्ठींच्या (शरद पवार) आदेशानंतरच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे,असा खुलासा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य सुरेंद्र सिरसाट यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.राजीनामा मागण्याच्या नेमक्या कारणासंदर्भात उधिक उहापोह करण्यास त्यांनी नकार दिला,मात्र या दोघांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी काय तो लवकरच निर्णय घेतील असेही ते म्हणाले.

डिसोझा आणि हळर्णकर यांचे राजीनामे स्वीकृत झाले तर मंत्रीपदी आपली वर्णी लावावी, यासाठी काँग्रेसमधील काहीजणांनी सध्या जोरदार प्रयत्न चालविले आहेत. खास करून माजी मंत्री व राज्य विधानसभेतील एकमेव महिला आमदार असलेल्या श्रीमती व्हिक्टोरिया फर्नांडिस उर्फ मामी, राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रभावी नेते म्हणून ओळखण्यात येणारे माजी मंत्री पांडुरंग मडकईकर, माजी मंत्री दयानंद नार्वेकर हे त्यात आघाडीवर आहेत. अर्थात राष्ट्रवादीचे पॉवरफूल आमदार जुझे डिसोझा व निळकंठ हळर्णकर यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक मिकी पाशेको यांनी शपथविधीची पुरती तयारीही करून ठेवली असल्याचे सांगण्यात येते. पक्षश्रेष्ठी दोघा मंत्र्यांचा राजीनामा स्विकारतात की नाही, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. गोव्यातील काँग्रेसप्रणित आघाडी सरकारमध्ये दोन मंत्री राष्ट्रवादीचे आहेत तर विधानसभेत पक्षाची आमदार संख्या एकूण तीन आहे.

Leave a Comment