
पुणे १५ मार्च पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाकडील पाच लाखापेक्षा अधिक अशा इतिहासाचा आधार असलेल्या मोडी कागदाचे वाचन झालेले नाही कारण मोडी लिपी वाचणारांची संख्या फारच थोडी आहे म्हणून मोडी लिपी वाचण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून भारत इतिहास संशोधक मंडळाने मोडी हस्ताक्षर स्पर्धा घेतली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तेरा वयाच्या मुलांपासून ते ८८ वयाच्या आजोबापर्यंत शंभराहून अधिक मंडळींनी त्यात सहभाग घेतला. आबेदा इनामदार मुस्लीम महाविद्यालयाच्या सहा मुलींनीही त्यात उत्साहाने भाग घेतला होता. मोडी हस्ताक्षर काढण्यास सध्या सर्वांच्या वापरात असलेले बॉलपेन पुरेसे नव्हते. त्याला बोरू, मोठे नीफ असलेला टाक, त्या पद्धतीचे पेन आणि शाईची दौत यांचा वापर करणे आवश्यक होते. या स्पर्धेसाठी सोळा ओळीचा देवनागरीतील मजकूर देण्यात आला होता. त्यात सहभागी होणारात विशेष उत्साह होता त्यातील प्रत्येकाची कारणे भिन्न होती. ८८ वयाच्या दशरथराव पारखे याचे म्हणणे असे होते की, सत्तर वर्षापूवी र् आम्ही मोडीतच शिक्षण घेत असू. पण नंतर काळ बदलला आणि लेखनासाठी देवनागरीचा वापर वाढला. त्या काळी मोडी हीच सामान्य व्यक्तीच्या व्यवहाराची लिपी होती. त्यातील अनेक गंमती या मोडीतच कळणे शक्य आहे. लहानपणी जिवापाड प्रेम करून जपलेली ही लिपी परत लिहायला मिळत आहे याचा मला येवढा आनंद मिळत आहे की मी जणू त्या सत्तर वर्षांपूर्वीच्या वातावरणातच रमत आहे. महिन्यापूर्वी जाहीर झालेल्या स्पर्धेनंतर लोकांनी अंकलिपी उपलब्ध करुन सराव केला व त्याच्या आधारे ही तयारी केली. आजच्या स्पर्धेत सोळा ओळीचा एक परिच्छेद देण्यात आला होता. आठवडयांनतर या स्पर्धेचा निकाल जाहीर होईल व प्रथम येणाराला बाळाजी आवजी चिटणीस पुरस्कार देण्यात येणार आहे.
