मुंबई : राज्यपाल शंकरनारायणन यांच्याकडून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन

मुंबई दि १५ मार्च – ऊर्जा ही जलद आर्थिक विकासाची मूलभूत गरज असून महाराष्ट्राला डिसेंबर २०१२ पर्यंत भारनियमनमुक्त करण्यासाठी विविध पावले उलण्यात आली आहेत.जैतापूर येथील स्थानिक लोकांच्या मनातील साशंकता दूर करून भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे असे स्पष्ट करीत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी सोमवारी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी सुरू झाले. दुपारी एक वाजता राज्यपालांचे अभिभाषण मध्यवर्ती सभागृहात झाले. यावेळी ते म्हणाले की, महाजेनकोने पारस आणि परळी येथे औष्णिक उर्जा प्रकल्प सुरू केले असून खापरखेडा येथील वीज प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. भुसावळ, चंद्रपूर आणि कोराडी येथेही वीज प्रकल्प उभारण्यात येत आहेत. महाराष्ट्र हे भारतातील एक अग्रेसर औद्योगिक राज्य आहे. जून २००५ मध्ये स्वीकारलेल्या विशाल प्रकल्प धोरणांतर्गत फेबुवारी – २०११ पर्यंत १६९ औद्योगिक विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून १ लाख ४४ हजार ५५६ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यातून २.१५ लाख व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील मागास भागातील १११ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून त्यापैकी ७० प्रकल्प मराठवाडा व विदर्भातील आहेत.

शेतकऱ्यांना बँकांमार्फत पीककर्ज देण्यास शासन कटीबद्ध आहे. पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणार्या  शेतकऱ्यांसाठी ५० हजार रूपयांपर्यतचे पीक कर्ज आता पूर्ण व्याजमुक्त असून पन्नास हजार रूपयांपासून तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर दोन टक्के व्याज आकारण्यात येणार आहे, असे राज्यपाल म्हणाले. बँकांनी फेब्रुवारी २०११ पर्यंत शेतकर्यां ना अल्प व्याजदराने ११ हजार ३५८ कोटी रूपये इतक्या पीक कर्जाचे वाटप केले असून २०१४-१५ पर्यंत पीक कर्जाचे वाटप २० हजार कोटी रूपयांपर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे.

राज्यपाल म्हणाले की, शासनाने २०१०-११ या वर्षाकरिता अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी ७९१९ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. राज्यातील सिचन प्रकल्पांकरिता करण्यात आलेली आतापर्यंतची ही सर्वाधिक तरतूद आहे. याबरोबरच १.७५ लाख हेक्टर अतिरिक्त सिचन क्षमता निर्माण करण्याचे शासनाने योजिले आहे. गावांच्या सर्वंकष व शाश्वत विकासासाठी पर्यावरण संतुलीत, समृद्ध ग्रामविकास अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जात असून पहिल्या वर्षात सुमारे १३ हजार गावे पात्र झाली आहेत. तसेच एक व्यक्ती एक झाड अभियानांतर्गत गावांमध्ये सुमारे ५.९३ कोटी झाडे लावण्यात आली आहेत.

Leave a Comment