जपान : जपानमध्ये आता वित्तीय सुनामी

टोकिओ १५ मार्च – भूकंप, त्यानंतर आलेली सुनामी आणि अणुभट्ट्यांत होत असलेले विस्फोट या पार्श्वभूमीवर प्रचंड पेचात सापडलेल्या जपानमध्ये आता आर्थिक सुनामी आली आहे. जपानी शेअर बाजारात सोमवारी सुमारे ६ टक्क्यांची घसरण झाली होती. त्यानंतर मंगळवारी जपानचा निक्कई निर्देशांक तब्बल १२ टक्क्यांची घसरला. दिवसअखेरीस हा निर्देशांक १०.५५ टक्क्यांची अर्थात १ हजार १५ अंकांची घट घेत ८ हजार ६०५ अंकांवर बंद झाला. १९८७ मध्ये आशियाई शेअर बाजार कोसळले होते, त्यानंतर जपानी शेअर बाजारात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

जपानमध्ये नव्याने आर्थिक संकट निर्माण झाले तर त्याचा मोठा परिणाम आशियाई आणि जागतिक वित्तीय बाजारावर होणार आहे. कारण जपानची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अणुभट्ट्यांत विस्फोट झाल्यानंतर किरणोत्सर्ग राजधानी टोकिओपर्यंत पोहोचल्याच्या शंकेने जपानमध्ये खळबळ माजली आहे. अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना जपान सोडण्याचा इशारा दिला आहे. फुकूशिमा दाईची कॉम्प्लेक्समधील अणुभट्ट्यांतील किरणोत्सर्ग धोकादायक होत असल्याचे निवेदन पंतप्रधान नाओटो कान यांनी केल्यानंतर बाँड फ्यूचरमध्ये मोठी मागणी आली. राजधानी टोकिओपासून फुकूशिमा दाईची कॉम्प्लेक्स २४० कि. मी. अंतरावर आहे.

निक्कई निर्देशांकातील २२५ पैकी एकही समभाग तेजीत बंद होऊ शकला नाही. सोमवारी बाजार घसरला होता मात्र बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीत बंद झाले होते. टॉपिक्स निर्देशांक सलग पाचव्या आठवड्यात घसरणीत बंद झाला आहे. देशातंर्गत फंड ऑपरेटर्स जपानी शेअर बाजारातून बाहेर पडण्यास उत्सूक आहेत. आगामी काळात परिस्थिती बिकट होण्याची शक्यता असल्याने गुंतवणुकदारांना जपानी बाजारात गुंतवणूक करण्यास स्वारस्य नाही, असे ओकासान सिक्युरिटीज्चे सुपरवायझर एच इशीगुरो यांनी सांगितले. मंगळवारी टॉपिक्स निर्देशांक १२.१ टक्क्यांनी घसरुन ७४३ अंकांवर बंद झाला. वर्ष २००८ मध्ये आलेल्या मंदीनंतर झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. चालू आठवड्यात टोकिओ स्टॉक एक्सेंजवर नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य तब्बल ७२० अब्ज डॉलर्सने कमी झाले आहे. निक्कई निर्देशांक आता दोन वर्षाच्या निचांकी स्तरावर आला आहे.

ज्या अणुभट्ट्यांत स्फोट होत आहेत, त्या अणुभट्ट्यांची मालकी असलेल्या टोकिओ इलेक्ट्रिक पॉवर कंपनीचा शेअर ट्रेड होऊ शकला नाही. या कंपनीचे समभाग विकण्यास बहुतांश समभागधारक तयार आहेत. अनेक सुरक्षित माध्यमांमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करु इच्छित आहेत. त्यामुळे बाँड, येन आणि इतर चलनांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. जपान सरकारसमोर केवळ नैसर्गिकच नव्हे तर आर्थिक संकटही निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया एका विश्लेषकाने दिली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत येनचे ८१.५३ इतके झाले आहे सोमवारी डॉलरच्या तुलनेत येन ८०.६० पर्यंत घसरला होता.

Leave a Comment