
मुंबई – मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते.
लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात आघाडी सरकारच्या नेत्यांचे एकमत
या बैठकीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. लॉकडाउन वाढवण्याबाबत या बैठकीत सर्वांचे एकमत झाले असून कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवणार असल्याची घोषणा केली असून तो कधीपर्यंत असेल याची सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही. जोपर्यंत केंद्र सरकारकडून लॉकडाउन ४ च्या नव्या अटी-शर्थींची सविस्तर माहिती दिली जात नाही, तोपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यावर या बैठकीत एकमत झाले आहे. त्याचबरोबर राज्यातील उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. पण कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचीही माहिती आहे. पण यासंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने सविस्तर माहिती दिल्यानंतरच राज्य सरकारडून याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.
