काल राज्यातील 115 जणांची कोरोनावर मात; आत्तापर्यंत 2 हजार 115 कोरोनामुक्त


मुंबई : काल राज्यात 678 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 12,974 वर पोहचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यात दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 115 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. तर आतापर्यंत राज्यातील एकूण 2115 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल दिवसभरात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 70 हजार 139 नमुन्यांपैकी 1 लाख 56 हजार 078 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 12 हजार 974 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 81 हजार 382 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 158 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात काल 27 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृत पावलेल्यांची एकूण संख्या 548 झाली आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील 21, पुण्यातील 4 आणि नवी मुंबईतील एक आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरुष तर 11 महिला आहेत. काल झालेल्या 27 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत. तर 10 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर तीनजण 40 वर्षांखालील आहे.