नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या 351 भाविकांना कोरोनाची लागण


नांदेड : केंद्र तसेच राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिल्यानंतर पंजाबमध्ये नांदेडहून काही भाविक परतले होते. त्यापैकी 351 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पंजाबमधील कोरोनाबाधितांचा आकडा 741 वर पोहोचला आहे. दरम्यान नांदेडहुन याआधीही पंजाबमध्ये परतलेल्यांपैकी काही जणांना कोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यातील 50 जणांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले होते.

नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खाल्लाळ यांनी दिली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी होणार आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

नांदेडमधील गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात राहणाऱ्या 97 व्यक्तींचा स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यातील 20 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यातील 25 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 11 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. एनआरआय भवन कोविड केअर सेंटरमध्ये या व्यक्तींना दाखल करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्यामुळे गुरुद्वार परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात पुर्वीचे 6 रूग्ण आणि नव्याने आढळून आलेले 20 रूग्ण असे एकूण 26 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत.

पंजाब राज्यापर्यंत गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना वाहन सेवा पुरवणारे 2 वाहन चालक आणि त्यांचा 1 मदतनीस यांचाही स्वॅब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. गुरुवार 23 एप्रिल रोजी हे वाहन चालक आणि मदतनीस पंजाब येथे जाऊन मंगळवार 28 एप्रिल रोजी परत आले होते. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्याच्या सिमेवरच त्यांना अडवून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. बुधवार 29 एप्रिल 2020 रोजी या तीन व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. सद्यस्थितीत शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे या रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नांदेड जिल्ह्यात आज (शनिवार) 2 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 1 हजार 235 संशयितांची नोंद झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे अहवाल घेण्यात आलेल्या एकूण 1 हजार 120 स्वॅबपैकी 1 हजार 9 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 65 जणांचा अहवाल येणे बाकी आहे. 5 जणांच्या स्वॅब तपासणीची आतापर्यंत आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. तसेच 14 जणांचा निष्कर्ष निघालेला नाही. सध्या पूर्वीचे 6 रुग्ण आणि नव्याने आलेल्या 20 रुग्णाचा स्वॅब असे एकूण 26 स्वॅब पॉझिटिव्ह आहेत. यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.