कोरोनाचा कर्नाटकात पहिला बळी, देशातील एकूण रुग्णांची संख्या ७७ वर


बंगळुरू – बुधवारी कर्नाटकातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून कोरोनाची लागण या व्यक्तीला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आज या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल समोर आला असून त्याला कोरोनाची लागण झाली होती, असे यामध्ये निष्पन्न झाले आहे.

कोरोना व्हायरसचे केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये नवे रुग्ण आढळून आल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ७७वर पोहोचली आहे. कोरोनाचे तीन नवे रुग्ण केरळच्या तिरुवअनंतपूरम, थ्रिस्सूर आणि कन्नूर जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. त्यामुळे १७ वर राज्यातील एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे. यामधील दोघे दुबई आणि कतारमधून परतले होते.

त्याचबरोबर कोरोनाचे आणखी तीन रुग्ण महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्येही आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १४ वर पोहोचली आहे. यामधील पुण्यामधील रुग्ण हा अमेरिकेतून आला होता, तर ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्सवरून आल्याची माहिती मिळत आहे.

तसेच, कोरोनाचा २६ वर्षीय रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आल्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने हा रुग्ण ग्रीसवरून परतल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर विशेष कक्षामध्ये या रुग्णाला ठेवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण मुंबईचा रहिवासी असून तो सहा मार्चला ग्रीसवरून मुंबईत आला होता. त्यानंतर तो आठ मार्चला विमानाने बंगळुरूला आला आणि नऊ मार्चला त्याने आपल्या ऑफिसमध्येही हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या चार जवळच्या मित्रांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याच दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा भाऊ बंगळुरूमध्ये राहत असून, त्याचे आई-वडील आणि पत्नी मुंबईमध्ये राहतात. त्याच्या कुटुंबीयांबाबत तसेच बंगळुरूमध्ये त्याने फिरण्यासाठी जी रिक्षा वापरली. रिक्षाचालकाबाबत माहिती काढण्यात आली असून, त्यांनाही निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment