
नवी दिल्ली – भारताने इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ हे विमान पाठवले असून ते विमान सोमवारी रात्री उशीरा दोनच्या सुमारास तेहरानमध्ये उतरेल. तसेच, मंगळवारी पहाटे ४.३० च्या सुमारास तेहरानहून निघून, सकाळी साडेनऊच्या सुमारास मायदेशी परत येईल, अशी माहिती सी-१७ ग्लोबमास्टरचे कप्तान, विंग कमांडर करन कपूर यांनी दिली.
इराणमध्ये पुन्हा एकदा ‘एअरलिफ्ट’
कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली इराणमध्ये सुमारे १,२०० भारतीय अडकले आहेत. विद्यार्थी आणि भाविकांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकार इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी इराणच्या संपर्कात असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मागील गुरूवारी संसदेत सांगितले होते. त्याचबरोबर ते म्हणाले होते, की इराण सरकारने परवानगी दिल्यास भारतीयांना परत आणण्याआधी इराणमध्येच त्यांची तपासणी करण्यासाठी केंद्र उभारण्यात येईल.
